गडचिरोली,
gadchiroli-srpf-vehicle-accidentगडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील राज्य राखीव पोलिस बलाच्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू तर तिचे पती व ३ वर्षाचा नातू गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील मंुडीपार येथील जांभुळपाणी फाटा परिसरात घडली. गीता मनोहर राऊत (५२) असे मृत महिलेचे नाव असून मनोहर बुधाजी राऊत (५५) व धु्रव सोमेश्वर राऊत (३) असे जखमी आजोबा व नातवाचे नाव आहे. तिघेही गोरेगाव तालुक्यातील जांभुळपाणी येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळ व नंतर ग्रामीण रुग्णालयात धाव घेत मृत महिलेच्या कुटूंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जखमी मनोहर राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या बयाणानुसार त्यांचा नातू सोमेश्वर याची प्रकृती बरी नसल्याने सोमवारी सकाळी ते तिघेही दुचाकी क्रमांक एमएच ३५ व्ही ८२४९ ने गोरेगाव येथे रुग्णालयात जात असताना मंुडीपार येथे गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावरील जांभूळपाणी फाटा परिसरात मागून येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील राज्य राखीव पोलिस बल क्रमांक १३ च्या वाहन चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगात चालूवन त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ज्यामध्ये मनोहर राऊत हे किरकोळ जखमी झाले तर त्यांचा नातू ध्रुव हा गंभीर जखमी त्यांची पत्नी गीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, अपघातग्रस्त पोलिस वाहनानेच तिघांनाही गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी तेथील डॉ. विजय पटले यांनी गीता राऊत यांना मृत घोषीत केले. तर नातू ध्रुव याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात रेफर हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालय गाठून जोपर्यंत मृताच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदिनी चानपूरकर, पोलिस निरीक्षक वैशाली ढाले, त्याचबरोबर वडसा येथील राज्य राखीव पोलिस बलचे पोलिस उपनिरीक्षक सिंह यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जि.प. बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, जि. प. सदस्य शशी भगत, माजी पं.स. सभापती मनोज बोपचे, पं.स. उपसभापती रामेश्वर महारवाडे, भाजपा तलुका सचिव आनंद चंद्रिकापूरे यांनी मध्यस्थी केली. दरम्यान, मृत गीता राऊत यांच्या पतीला एसपीओ योजनेंतर्गत दरमाह १० हजार रुपये व पोलिस विभागाच्या नियमानुसार देण्यात येणार्या इतर आर्थिक मदतीसह अंत्यसंस्कारासाठी मदत देण्याचे आश्वासन पोलिस विभागाकडून देण्यात आले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.