न्यूझीलंड दौऱ्यात गंभीर यांची चांदी

पगाराव्यतिरिक्त मिळणार ९ लाख रुपये

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Gambhir hits the jackpot भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या वेतनासोबतच परदेश दौऱ्यादरम्यान मिळणाऱ्या भत्त्याचीही सध्या चर्चा सुरू आहे. २०२४ मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गंभीर सध्या संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. २२ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा दौरा १ डिसेंबरपर्यंत चालणार असून, त्याचा कालावधी सुमारे ४० दिवसांचा आहे. या दौऱ्यात नियमित वेतनाव्यतिरिक्त गंभीर यांना दररोज २५० अमेरिकी डॉलर इतका भत्ता मिळतो. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे २३ हजार ७०० रुपये होते. त्यामुळे ४० दिवसांच्या दौऱ्यात केवळ या भत्त्यापोटी त्यांना नऊ लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
 
 
 
gamabhir
 
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) गौतम गंभीर यांना वर्षाला १४ कोटी रुपये वेतन दिले जाते. म्हणजेच त्यांचे मासिक वेतन एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय परदेश दौऱ्यांमध्ये त्यांच्या निवासाची, प्रवासाची आणि इतर आवश्यक सुविधांची जबाबदारीही बीसीसीआयकडून घेतली जाते. गंभीर यांच्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते, तर विमान प्रवासासाठी व्यावसायिक श्रेणीतील तिकिटांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे दौऱ्यादरम्यान मिळणाऱ्या भत्त्यासोबतच त्यांना अनेक उच्च दर्जाच्या सुविधांचाही लाभ मिळतो.
 
 
गौतम गंभीर यांच्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांना वार्षिक १२ कोटी रुपये वेतन मिळत असल्याचे वृत्त होते. त्या तुलनेत गंभीर यांचे वार्षिक वेतन दोन कोटी रुपयांनी अधिक असल्याचे सांगितले जाते. गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ मध्ये टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मैदानावरील संघाच्या कामगिरीसोबतच मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीर यांना मिळणारे वेतन, भत्ते आणि परदेश दौऱ्यातील सुविधाही चर्चेचा विषय ठरत आहेत.