गोंदिया न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी

ई-मेल मुळे पोलिस यंत्रणेत धावपळ न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
गोंदिया,
gondia-court-bomb-threatयेथील जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी २ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेसह न्यायालयीन प्रशासनात एकच खळबळ उडाली. न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर सकाळी १०:२६ वाजता आलेल्या या मेलमध्ये दुपारी ३:११ वाजता न्यायालयाला बॉम्बने उडविण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयीन प्रशासनाकडून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांना माहिती देत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.
 
gondia court
 
 
‘बब्बर खालसा परमार खालसा गरकालसिंग’ असे नाव नमूद असलेल्या व्यक्तीकडून smitjohnson6889@gmail.com या ई-मेल आयडीवरून हा धमकीचा संदेश पाठविण्यात आल्याचे समोर आले. संदेशात नमूद केलेली वेळ लक्षात घेता पोलिसांनी कोणतीही जोखीम न पत्करता तातडीने न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविली. गोंदिया शहर, रामनगर, गोंदिया ग्रामीण आणि रावणवाडी पोलिस ठाण्यांतील पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक, दंगा नियंत्रण पथक, अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिकांनाही पाचारण करण्यात आले.
 
 
पोलिसांनी सर्वप्रथम न्यायालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढून न्यायालयाच्या इमारतीतील विविध विभाग, खोल्या, प्रवेशद्वारे तसेच परिसराची तपासणी केली. श्वान पथक, बॉम्ब शोध व नाशक पथकाकडून प्रत्येक संशयास्पद ठिकाणाची पाहणी करण्यात आली. यावेळी सुदैवाने कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे हा संदेश केवळ धमकीचा ई-मेल असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
 
 
न्यायालयाला आले छावणीचे स्वरूप
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी तातडीने अधीनस्थ अधिकारी-कर्मचार्‍यांना न्यायालयात पाठवून स्वतःही न्यायालय गाठले व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्यासह शहर ठाणेदार प्रवीण बोरकुटे, ग्रामीणचे परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवले, रामनगरचे ठाणेदार तिरुपती राणे, रावणवाडीचे ठाणेदार शेवते, त्याचबरोबर चार पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी, याशिवाय आरसीबीची दोन पथके, बॉम्ब शोध व नाशक पथक, असे १५ अधिकारी आणि १०३ पोलिसांनी न्यायालय परिसर गाठल्याने परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.