मानोरा,
dilip joshi विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने करत आहे. संघाचे कार्य आज ९६ देशांपर्यंत पोहोचले असून संघाने शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. हिंदुत्व हीच राष्ट्रीयत्वाची संकल्पना आले असे प्रतिपादन विद्यावाचस्पती प्रा. दिलीप जोशी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खंड मानोरा यांच्या वतीने रविवार,१ नोव्हेंबर रोजी माहेश्वरी भवन, मानोरा येथे विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहरातील डॉ. महेंद्र मोहनसिंग चव्हाण, तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यावाचस्पती प्रा. दिलीप जोशी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉ. महेंद्र मोहनसिंग चव्हाण यांनी आपल्या संबोधनात हिंदुत्वाच्या व्यापक संकल्पनेवर विचार मांडले. ते म्हणाले, हिंदुत्वाची व्याख्या केवळ धर्म आणि हिंदुस्थानापुरती मर्यादित नसून अखंड भारताची संकल्पना, देशाचे सार्वभौमत्व आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्वाकडे व्यापक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
प्रा. दिलीपजी जोशी यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेतला. पुढे बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कलम ३७०, गोमातेला राज्यमातेचा दर्जा आणि देशाच्या राष्ट्रीय धोरणांशी संबंधित विविध विषयांचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा स्वयंसेवक म्हणून उल्लेख करत त्यांनी या निर्णयांच्या संदर्भात संघविचारांची भूमिका अधोरेखित केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक देव, देश आणि धर्मासाठी कार्य करत विश्वपटलावर शांतता प्रस्थापित करण्यासह भारताला पुन्हा विश्वगुरूच्या स्थानावर नेण्यासाठी योगदान देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संघाने पाहिलेले अखंड भारताचे स्वप्न भविष्यात साकार होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान संघाचे विचार, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक एकात्मता आणि स्वयंसेवकांच्या कर्तव्यभावनेवर प्रकाश टाकण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित स्वयंसेवकांच्या सहभागामुळे विजयादशमी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.