‘इंडिया आघाडी’च्या रॅलीमुळे १० हजार कोटींचे नुकसान

दिल्लीतील व्यापारी संघटनेचा आरोप; जवळपास ८० टक्के दुकाने बंद

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |

 

नवी दिल्ली
india bloc rally निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि ‘एसआयआर’च्या विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या रॅलीमुळे अडथळे निर्माण होऊन येथील २० ते २५ प्रमुख बाजारपेठांमधील सुमारे अडीच लाख दुकाने बंद राहिली. या रॅलीमुळे व्यापाऱ्यांना जवळपास १० ते ११ हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले, असा आरोप ‘चेंबर ऑफ ट्रेड ॲण्ड इंडस्ट्रीने (सीआयटी) केला आहे.
 

india rally
 

रॅलीच्या ठिकाणाजवळील बाजारपेठारांमधील सुमारे तीन लाख दुकानांपैकी ८० टक्के दुकाने बंद होती, असे सीआयटीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी सांगितले. वाहतुकीवरील निर्बंध, गर्दी आणि मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले. या गोंधळामुळे राष्ट्रीय राजधानीच्या आसपासच्या शहरांतून येणारे ग्राहक, पुरवठादार आणि विक्रेते यांच्या येण्या-जाण्यावरही परिणाम झाला.

 
व्यवसायानिमित्त दिल्लीत येणारे सुमारे तीन ते चार लाख लोक येऊ शकले नाहीत, तर टेम्पो आणि ट्रकसह सुमारे पाच हजार जुनी दिल्ली आणि मध्य दिल्लीतील बाजारपेठांपर्यंत माल पोहोचवू शकली नाहीत, असा दावा गोयल यांनी केला. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’शी (सीएआयटी) संबंधित विविध बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी तीन लाखांपैकी जवळपास अडीच लाख म्हणजे सुमारे ८० टक्के दुकाने बंद होती.
 

नुकसान भरपाई कोण देणार?

महारॅलीमुळे मालाची ने-आण आणि चढ-उतार पूर्णपणे विस्कळीत झाले. दिवाळीच्या मुख्य हंगामात, या बाजारपेठांमध्ये एकत्रितपणे १० ते १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. आता व्यवसायात आलेल्या या व्यत्ययाबद्दल व्यापाऱ्यांना भरपाई कोण देणार, असा सवालही गोयल यांनी केला आहे.


व्यापाऱ्यांनी नुकसानाबाबत दिला होता इशारा

या मेळाव्याच्या आधी, दिल्लीतील अनेक प्रमुख व्यापारी केंद्रांमधील व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या खरेदीच्या हंगामात रामलीला मैदानावर रॅली आयोजित करण्याला विरोध दर्शवला होता. त्यांनी वाहतूक कोंडी आणि निर्बंधांमुळे घाऊक बाजारपेठा विस्कळीत होऊ शकतात आणि हजारो रोजंदारी कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला होता.


रॅलीच्या वेळेवर आणि ठिकाणावर आक्षेप

रॅलीच्या ठिकाणामुळे तीन किलोमीटरच्या परिसरातील व्यावसायिक हालचालींवर परिणाम होऊ शकतो, असे ‘ऑटोमोटिव्ह पार्ट्स मर्चंट असोसिएश’ने (एपीएमए ने म्हटले होते. व्यापारी लोकशाही मार्गाने होणाऱ्या निदर्शनांच्या विरोधात नाहीत; परंतु त्यांना रॅलीच्या वेळेवर आणि निवडलेल्या ठिकाणावर आक्षेप आहे, असे एपीएमए अध्यक्ष विनय नारंग यांनी स्पष्ट केले होते.