अनिल कांबळे
नागपूर,
traffic police वाहतूक शाखेतील विविध विभागात कार्यरत असलेले १६ वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना अचानक पोलिस मुख्यालयात संलग्न करण्यात आले होते. त्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी प्रलंबित असून चौकशी अंती निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, संलग्न करण्यात आलेल्यांच्या यादीत काही कर्मचाऱ्यांनी थेट ‘मॅट’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सलग्नतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या १६ पोलिस कर्मचाऱ्यांना २३ ऑक्टोबरला तडकाफडकी पोलिस मुख्यालयाला सलग्न करण्यात आले होते. प्रशासकीय कारणास्तव मुख्यालयात सलग्न केल्याचे आदेश मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी काढले होते. त्या यादीनंतर वाहतूक पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध स्वरुपाच्या तक्रारी होत्या तसेच कर्तव्य बजावताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याच कारणास्तव वाहतूक कर्मचाऱ्यांना मुख्यालयात सलग्न केल्याची माहिती पोलिस उपायुक्त कार्यालयाने दिली. मात्र, या यादीतील काही कर्मचाऱ्यांना संलग्न केल्यामुळे धक्का बसला. ‘कर्तव्यात कोणताही कसूर केल्याचा किंवा कोणतीही तक्रार असल्याबाबत नकार दिला.’ त्यामुळे या संलग्नतेमुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
झारीतील शुक्राचार्य अजूनही सक्रिय ?
कर्तव्यात कसूर करणारे वाहतूक शाखेत काही पोलिस कर्मचारी अजुनही सक्रिय आहेत. त्यांचीसुद्धा माहिती पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून गोळा केली जात आहे. मात्र, यादीतील काही जण अन्याय झाल्यामुळे ‘मॅट’मध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणी चौकशी अजुनही सुरु असून चौकशी अंती योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्तांनी दिली आहे.