महालक्ष्मी एक्स्प्रेसवर मध्यरात्री दरोडा!

सिग्नलच्या वायर कापून ट्रेन रोखली; दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई
mahalaxmi express robbery मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री दरोड्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून धावती रेल्वे तब्बल १५ मिनिटे थांबवली. प्रवासी गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी संधी साधत दोन महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून नेले. या घटनेत ५२ हजार ६०० रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असून, रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

mahalaxmi express robbery 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मिरज रेल्वेमार्गावर सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला. दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी सर्वप्रथम रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अचानक थांबली. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे रेल्वे थांबल्याचे समजून प्रवाशांना सुरुवातीला नेमके काय घडले, याचा अंदाज आला नाही. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रेल्वेच्या एस-२, एस-३ आणि एस-५ या डब्यांमध्ये प्रवेश केला.
 
 
मुंबईतील रहिवासी सुनिता गोरक्षनाथ तुपे आणि खोपोली येथील त्यांच्या सहप्रवासी सुरेखा खाडे या कौटुंबिक कार्यक्रमासाठी कोल्हापूरला जात होत्या. दोघीही प्रवासादरम्यान झोपेत असताना चोरट्यांनी खिडकीतून हात घालून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावले. या दागिन्यांची एकूण किंमत ५२ हजार ६०० रुपये असल्याचे समोर आले आहे. चोरी केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रेल्वेवर दगडफेकही केली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
 
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सिग्नल यंत्रणेची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आणि सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. या प्रकरणी सिग्नल यंत्रणेची तोडफोड केल्याबद्दल लोणंद रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिला प्रवाशांचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिसांत स्वतंत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, या घटनेचा तपास पोलिसांनी अधिक तीव्र केला असून, श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेतली जात आहे. सिग्नल यंत्रणेच्या वायर नेमक्या कशा कापण्यात आल्या, तसेच या घटनेमागे पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास केला जात आहे. रेल्वे थांबवून नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. पुढील तपास आणि कारवाईसाठी पोलिसांचे पथक साताऱ्याला रवाना झाले आहे.
 
 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असताना महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वे थांबवण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने रेल्वे मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.