कॅप्टन तुम्ही मी नौका’ने वेधलं लक्ष, पाहा कोणते कलाकार झळकणार!

‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’मधील पहिलं गाणं रिलीज

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई
maharashtra epstein files गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकताही वाढली आहे.
 

maharashtra epstein files  
‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’मधील कलाकारांचे चेहरे नुकतेच प्रेक्षकांसमोर आले होते. आता चित्रपटातील ‘कॅप्टन तुम्ही मी नौका’ हे पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. पॅनोरामा म्युझिक मराठी या यूट्यूब चॅनेलवर हे गाणे उपलब्ध आहे. गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी या गाण्याला आवाज दिला असून, रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केले आहे. तर संजय नावगिरी यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. गाण्याचे भावपूर्ण बोल आणि सादरीकरणामुळे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिसाद मिळत आहे.
 

चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?
‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’मध्ये ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी भोंदूबाबाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री दीपाली सय्यद, अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री माधुरी पवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर या कलाकारांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
 
 

२० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत होणार प्रदर्शित
‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून राज्यातील उच्चस्तरीय राजकीय आणि सामाजिक वर्तुळाशी संबंधित अनेक गुपिते समोर आणली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्यासमोर अनेक अडचणी आल्याची चर्चा होती. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ट्रेलरनंतर पहिल्या गाण्यामुळेही चर्चेत आलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.