९५.१५ टक्के मतदारांची कागदपत्रे वैध

राज्यातील ‘एसआयआर’ प्रक्रिया; १.२२ कोटी मतदारांना नोटिसा

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई
maharashtra voter list महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या १ कोटी २२ लाख मतदारांपैकी ९५.१५ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. या मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची प्रकरणे निकाली काढून ते अंतिम मतदार यादीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. ३० ऑक्टोबरपर्यंतची ही आकडेवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
 

maharashtra voter list SIR: 95.15% verification completed, 1.22 crore voters issued notices 
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटिसा बजावण्यात आलेल्या एकूण मतदारांपैकी सुमारे १ कोटी १६ लाख मतदारांची कागदपत्रे प्राप्त झाली असून त्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सुमारे सहा लाख मतदारांची कागदपत्रे अद्याप सादर होणे किंवा त्यांची पडताळणी पूर्ण होणे बाकी आहे. सर्व १.२२ कोटी नोटिसा संबंधित मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
नोटिसा मिळालेल्या मतदारांचे दोन प्रमुख गट आहेत. मागील मतदार यादीतील नोंदींशी तार्किक विसंगती आढळलेल्या ६२.४८ लाख मतदारांपैकी ९६.५१ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर मागील पुनरीक्षणातील नोंदींशी स्वतःची किंवा नातेवाइकांची नोंद जुळवता न आलेल्या ५९.७५ लाख मतदारांपैकी ९३.७३ टक्के मतदारांची कागदपत्रे तपासून झाली आहेत.
प्रलंबित प्रकरणांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलए) संबंधित मतदारांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) देखील संबंधित मतदारांपर्यंत पोहोचून कागदपत्रे गोळा करीत आहेत.
 
 
नोटीस मिळाली म्हणजे मतदाराचे नाव मतदार यादीतून आपोआप वगळले जाणार, असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येक प्रकरणाची कागदपत्रांच्या आधारे स्वतंत्र तपासणी केली जाईल. कागदपत्रे अपुरी किंवा विसंगत असल्यास संबंधित मतदाराला सुनावणीची संधी दिली जाईल. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आहे.
जिल्हानिहाय मतदार पडताळणीची स्थिती
 
जिल्हा पडताळणी पूर्ण (%)
गडचिरोली ९९.८६
ठाणे ९९.८५
चंद्रपूर ९९.४७
मुंबई शहर ९९.३७
नाशिक ९९.२२
मुंबई उपनगर ९९.१९
नागपूर ९४.३०
पुणे ९३.४०
गोंदिया ८८.७४
छत्रपती संभाजीनगर ८५.०६
जालना ७४.०६
लातूर ७२.९१
नांदेड ७०.१३
महाराष्ट्र (एकूण) ९५.१५
१३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे वेळापत्रक पुन्हा बदलले असून प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती आता शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत देता येतील. याआधीची मुदत २६ ऑक्टोबर होती. नोटिसा आणि दावे-हरकतींवरचे निर्णय बुधवार, २५ नोव्हेंबरपर्यंत होतील आणि अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरऐवजी सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.