पुणे
maharashtra weather ऑक्टोबर महिन्याचा शेवट आणि नोव्हेंबरची सुरुवात राज्यातील काही भागांसाठी पावसाच्या सरी घेऊन आली आहे. पुणे, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, तर अनेक भागांत रस्ते जलमय झाले. पावसाच्या जोरदार आगमनामुळे काही ठिकाणची वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असली, तरी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागांत अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम असून, पाणीटंचाईची चिंता अधिक गडद झाली आहे.

राज्यात ऑक्टोबर महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. संपूर्ण महिन्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ९५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ७४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या ३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे, राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महिनाभर पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. मुंबई शहर, धुळे, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांत शून्य पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शंभर टक्के तूट निर्माण झाली आहे.
मुंबई शहरात ऑक्टोबर महिन्यात सरासरी ७३.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात एकही मिलिमीटर पाऊस झालेला नाही. मुंबई उपनगरांमध्येही पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. येथे सरासरी ८१.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ १४.६ मिलिमीटर पाऊस पडला असून, ८२ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे. मराठवाड्यातील परिस्थितीही चिंताजनक असून, ऑक्टोबर महिन्यात या विभागात एकही मिलिमीटर पावसाची नोंद झालेली नाही.
मध्य महाराष्ट्रात सरासरी ७७.९ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४.१ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या विभागात ९५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. विदर्भातही पावसाने मोठी ओढ दिली असून, सरासरी ५७.८ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ २.२ मिलिमीटर पाऊस झाला. परिणामी, विदर्भात ९६ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे.
कोकण-गोवा विभागातही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीय कमी राहिले. या विभागात ऑक्टोबर महिन्यात सरासरी ११६.४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ १९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे येथे ८४ टक्के पावसाची तूट आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ही तूट ९६ टक्क्यांवर पोहोचली असून, ठाणे जिल्ह्यात ८४ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे.
एकीकडे पुणे, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी राज्यातील एकूण पावसाची आकडेवारी गंभीर परिस्थिती दर्शवत आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाची मोठी तूट लक्षात घेता पाणीटंचाईचे संकट कायम आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला काही भागांत झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी राज्यातील पावसाची तूट भरून निघण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे.