आजारी मुलीला खांद्यावर घेऊन आईची ७ किलोमीटरची पायपीट

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
आंध्र प्रदेश
mother carries sick daughter 7 km आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातून माणुसकीला हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने एका आईला आपल्या आजारी १२ वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेऊन तब्बल सात किलोमीटरची पायपीट करावी लागली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला होता. त्यामुळे गावात रुग्णवाहिकेसह कोणतेही वाहन पोहोचू शकत नव्हते. अशा परिस्थितीत मुलीला वेळेत उपचार मिळावेत, यासाठी आईने खडतर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून, गावातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 

आजारी मुलीला खांद्यावर घेऊन आईची ७ किलोमीटरची पायपीट  mother carries sick 12-year-old daughter on her shoulders for 7 km to reach hospital in andhra pradesh  आंध्र प्रदेश mother carries sick daughter 7 km आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातून माणुसकीला हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने एका आईला आपल्या आजारी १२ वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेऊन तब्बल सात किलोमीटरची पायपीट करावी लागली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला होता. त्यामुळे गावात रुग्णवाहिकेसह कोणतेही वाहन  
विजयनगरम जिल्ह्यातील श्रृंगावरपुकोटा तालुक्यातील दारापर्थी पंचायतीअंतर्गत पल्लापु दुंगडा हे आदिवासी गाव आहे. येथील जन्नी सुकरम्मा आणि कन्नय्या यांच्या १२ वर्षीय मुलीची प्रकृती अचानक बिघडली. तिच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे होते. मात्र, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. तसेच गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका किंवा अन्य कोणतेही वाहन तेथे पोहोचणे शक्य नव्हते.
मुलीची प्रकृती लक्षात घेऊन सुकरम्मा यांनी धीर सोडला नाही. त्यांनी आजारी मुलीला खांद्यावर घेतले आणि डोंगराच्या पायथ्यापर्यंत सुमारे सात किलोमीटरचा अवघड प्रवास पायी पूर्ण केला. तेथून त्यांनी ऑटोरिक्षाने मुलीला दक्षिण कोटा येथील खासगी रुग्णालयात नेले. रुग्णालयात मुलीवर उपचार करण्यात आले आणि तिची प्रकृती सुधारली. उपचारानंतर सुकरम्मा यांनी पुन्हा मुलीला खांद्यावर घेत गावाकडे परतीचा प्रवास केला. एका आईने मुलीसाठी केलेल्या या संघर्षाची परिसरात चर्चा सुरू आहे.
या घटनेनंतर गावातील रस्त्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे आठ वर्षांपूर्वी रस्ते योजनेअंतर्गत पल्लापु दुंगडा गावाला जोडण्यासाठी ६.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामासाठी ४ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. रस्त्याचे काम सुरूही झाले होते. मात्र, वनविभागाची परवानगी आणि कामासाठी निश्चित केलेली मुदत संपल्याने बांधकाम अर्धवट सोडण्यात आले.
दरम्यान, वाढत्या महागाईमुळे रस्त्याच्या कामाचा खर्च सुमारे ६५ लाख रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने सुधारित खर्चाचा प्रस्ताव पुढे पाठवला असला तरी त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परिणामी, गावकऱ्यांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात गावात वाहनांची ये-जा बंद होत असल्याने आजारी व्यक्तींना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे कठीण बनते. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याची भीतीही कायम आहे.एका आईला आजारी मुलीला खांद्यावर घेऊन सात किलोमीटर चालावे लागल्याच्या घटनेने गावातील पायाभूत सुविधांची दयनीय स्थिती समोर आली आहे. मंजुरी मिळूनही आठ वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.