गुंतवणुकीच्या नावावर दीड कोटींचा गंडा

पैसे मागताच पिस्तूल रोखली; - श्रीकृष्ण बुटींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur investment fraud बिटकॉइन आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका प्रॉपर्टी डीलरकडून तब्बल १ कोटी ५० लाख रुपये घेतले. मात्र, गुंतवणुकीची रक्कम परत मागितल्यानंतर पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी राकेश वासुदेव डेकाटे (४८, रामदेव आवास, सोनेगाव) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. श्रीकृष्ण प्रफुल्ल बुटी (५९, रा. श्रद्धानंदपेठ) असे आरोपीचे नाव आहे.
 
 

fraud
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश डेकाटे हे प्रॉपर्टी डीलर आहेत. दोघांची मुले एकाच ठिकाणी शिक्षण घेत असल्याने २०१७ मध्ये डेकाटे आणि बुटी कुटुंबीयांची ओळख झाली. या परिचयातून बुटीने डेकाटे यांचा विश्वास संपादन केला. बिटकॉइन आणि शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. डेकाटे यांनी २०१७ ते २०२० या कालावधीत टप्प्याटप्प्याने एकूण १ कोटी ५० लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
 
 
पिस्तूलाचा दाखवला धाक
गुंतवणुकीची रक्कम परत करण्याची वेळ आल्यानंतर बुटी टाळाटाळ करू लागला. अखेर ११ सप्टेंबर रोजी बुटी हा डेकाटे यांच्या फ्लॅटवर पोहोचला. यावेळी डेकाटे यांनी आपले पैसे लवकर परत करण्याची मागणी केली. त्यावर बुटीने टेबलवर पिस्तूल ठेवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर इमारतीखाली सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
राजकीय संबंधाचा धाक
डेकाटे यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला विश्वास संपादन करून पैसे घेतल्यानंतर बुटीने वेगळीच भूमिका घेतली. पैसे परत मागणाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी मोठ्या राजकीय व्यक्तींची नावे घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच पैसे मागणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी दिल्याचे डेकाटे यांनी पोलिसांना सांगितले. या तक्रारीच्या आधारे सोनेगाव पोलिसांनी बुटीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणुकीच्या व्यवहारांची पार्श्वभूमी, पैशांचा प्रवाह आणि पिस्तूल दाखवून धमकावल्याच्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.