दिवाळीपूर्वी नागपूर पोलिसांची नागरिकांना अनोखी भेट

सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील १८० हरविलेले मोबाईल शोधले; ३१.५६ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर

nagpur police दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी नागरिकांना आनंदाची भेट दिली आहे. परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हरविलेल्या तब्बल १८० मोबाईलचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात आला. सुमारे ३१ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचे हे मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
 

nagpur police recover 180 lost mobile phones worth rs 31.56 lakh before diwali 
कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली आणि शांतीनगर या पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल हरविल्याच्या प्राप्त तक्रारींच्या आधारे तपास करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि सायबर यंत्रणेच्या मदतीने मोबाईलचा शोध घेण्यात आला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे मोबाईल हस्तगत करणे शक्य झाले.
या कारवाईत पोलीस ठाणेनिहाय कोतवाली पोलिसांनी १४ मोबाईल (२ लाख ६३ हजार रुपये), गणेशपेठ पोलिसांनी २० मोबाईल (३ लाख १४ हजार ५०० रुपये), तहसील पोलिसांनी ३२ मोबाईल (७ लाख ५ हजार रुपये), लकडगंज पोलिसांनी २६ मोबाईल (४ लाख २१ हजार रुपये), पाचपावली पोलिसांनी ६७ मोबाईल (११ लाख ४५ हजार रुपये) आणि शांतीनगर पोलिसांनी २१ मोबाईल हस्तगत केले.
या मोहिमेत कोतवालीचे वरिष्ठ nagpur police पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, गणेशपेठचे अतुल तावडे, तहसीलचे ठाणेदार संजय मेंढे, लकडगंजचे ठाणेदार मुकुंद कवाडे, पाचपावलीचे ठाणेदार जितेंद्र बोबडे आणि शांतीनगरचे ठाणेदार गजानन तामटे यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. परिमंडळ क्रमांक ३ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयातील महेंद्र सेलुकर तसेच सायबर शाखेचे मदतनीस रूपांशु यादव, केतकी तांबेकर, श्रुती धोटे, अश्विनी बावनकर आणि वैष्णवी बावनकर यांनीही तांत्रिक तपासात सहकार्य केले. पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग), परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त तसेच लकडगंज व कोतवाली विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या तांत्रिक तपासाची आणि नागरिकांप्रती असलेल्या बांधिलकीची या कारवाईतून प्रचिती आली.