शहरातील दोन अपघातांत तीन ठार

दोन जण गंभीर जखमी

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur road accidents शहरात भरधाव वाहने चालविताना वाहनांवरील नियंत्रण सुटून झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. वाडीतील खडगाव रोडवर एका वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा मृत्यू झाला, तर खापरखेडा परिसरात ट्रकच्या धडकेत एका २२ वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन्ही अपघातांतील आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
 

nagpur road accidents three killed and two seriously injured in two separate crashes 
वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडगाव रोडवरील लावा स्मशानघाटाजवळ पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलॅन्ड वाहनाने हिरो होंडा डिलक्स मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील राजू ठाकूर (५४), सिद्धार्थ चोखाराम धोंगडे (६०) आणि आकाश चुन्नीलाल चोखांद्रे (५५) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालकाने जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी राजू ठाकूर आणि सिद्धार्थ धोंगडे यांना मृत घोषित केले. तर आकाश चोखांद्रे यांच्यावर किंग्सवे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश काटकर यांच्या तक्रारीवरून वाहनचालक सुभाष दामोदर मोटघरे याच्याविरुद्ध वाडी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उत्तम जायभाये करीत आहेत.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सब्बलनाला, चणकापूर-सावनेर मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला. ऋषिकेश विष्णू वंजाळ (२२, रा. वलनी वस्ती, खापरखेडा) हा नवीन मोटारसायकलवर आपल्या ८० वर्षीय आजी चिमाबाई शंकर वंजाळ यांना घेऊन नातेवाईकांकडे जात होता. यावेळी भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. धडकेनंतर ऋषिकेश हा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चिमाबाई गंभीर जखमी असून, त्यांच्यावर न्यू लाईफ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालकही घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी विनोद गोपाळ मुल्हार यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.