विरोधकांच्या रॅलीचा फटका दिवाळी बाजाराला

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Opposition rally hits the market नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित विरोधी पक्षांच्या रॅलीचा राजधानीतील व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसल्याचा दावा व्यापारी संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) यांनी केला आहे. या रॅलीमुळे दिल्लीतील व्यापाराचे सुमारे ११ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा संघटनेचा अंदाज आहे. रॅलीच्या दिवशी राजधानीतील जवळपास ८० टक्के दुकाने बंद राहिल्याचेही संघटनेने म्हटले आहे. सीटीआयचे अध्यक्ष बृजेश गोयल यांच्या म्हणण्यानुसार, रॅलीपूर्वी या कार्यक्रमाला सुमारे १० लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना आणण्यासाठी १५ ते २० हजार वाहनांची व्यवस्था केली जाण्याचा अंदाज होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत वाहतूक निर्बंध आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. याचा थेट परिणाम बाजारपेठांमधील ग्राहकांची वर्दळ आणि व्यावसायिक व्यवहारांवर झाला. सामान्य दिवसांत खरेदी आणि व्यवसायासाठी दिल्लीबाहेरून दररोज तीन ते चार लाख लोक राजधानीत येतात. मात्र, रॅलीच्या दिवशी बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे गोयल यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले.
 
 
 
rahul gandhi
 
रामलीला मैदानाच्या आसपासच्या २२ ते २५ प्रमुख बाजारपेठांमध्ये मिळून जवळपास तीन लाख दुकाने आहेत. विविध बाजार संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॅलीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत यापैकी सुमारे अडीच लाख दुकाने बंद होती. म्हणजेच जवळपास ८० टक्के व्यापारी प्रतिष्ठानांचे व्यवहार ठप्प होते. ज्या दुकानांनी आपले कामकाज सुरू ठेवले, तिथेही ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प होता. रॅली पुढे ढकलण्याची मागणी करण्यासाठी सीटीआयने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चार वेळा पत्र पाठवले होते. जवळपास १०० प्रमुख बाजार संघटनांनीही अशीच मागणी केली होती. मात्र, यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे बृजेश गोयल यांनी स्पष्ट केले. व्यापारी म्हणून दिवाळीच्या महत्त्वाच्या हंगामात आपला व्यवसाय आणि उपजीविका सुरक्षित राहावी, एवढीच संघटनेची भूमिका होती, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी रॅलीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना दिल्लीतील बाजारपेठांमध्ये खरेदी करून व्यापाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या भूमिकेचे गोयल यांनी स्वागत केले; मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर दुकानेच बंद असल्याने रॅलीसाठी आलेल्या लोकांना खरेदी करणे शक्य झाले नाही, असे त्यांनी नमूद केले.
 
 
रॅलीचा परिणाम केवळ बाजारपेठांमधील ग्राहकांच्या संख्येवरच झाला नाही, तर मालवाहतूक आणि पुरवठा साखळीवरही झाला. रामलीला मैदानाच्या दहा किलोमीटर परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याने माल चढवणे आणि उतरवण्याची प्रक्रिया जवळपास ठप्प झाली होती, असा सीटीआयचा दावा आहे. नरेला, बवाना, ओखला, मायापुरी, मुंडका आणि उद्योग नगर यांसह दिल्लीतील ५६ औद्योगिक क्षेत्रांतून दररोज सुमारे पाच हजार ट्रक आणि टेम्पो माल घेऊन बाजारपेठांमध्ये पोहोचतात. मात्र, रॅलीच्या दिवशी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी तयार केलेला माल गोदामांमध्येच अडकून पडला. तो वेळेत दुकानांपर्यंत पोहोचू शकला नाही. धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वीचा काळ व्यापाऱ्यांसाठी वर्षातील सर्वाधिक महत्त्वाचा विक्रीचा हंगाम मानला जातो. त्यामुळे या काळात वाहतूक किंवा व्यापारात निर्माण झालेल्या कोणत्याही अडथळ्याचा परिणाम वर्षभराच्या कमाईवर होऊ शकतो, अशी चिंता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.