‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’

लावणीच्या अस्सल विश्वाची झलक दाखवणारा ‘फुलवरा’चा टीझर प्रदर्शित; १४ जानेवारीला चित्रपट येणार भेटीला

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई
phulwara teaser कलाकार कोणत्याही प्रांतातील असो किंवा कोणत्याही कलाक्षेत्रातील, त्याच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात सर्वाधिक महत्त्वाचा असतो तो कलेप्रती असलेला ध्यास आणि समर्पण. हा ध्यास कलाकाराला अनेक संघर्षांना सामोरे जाण्याचे बळ देतो. असंख्य अडचणींवर मात करत कलेची साधना करणारा कलाकारच त्या कलेचा खरा उपासक ठरतो. कलाकारांच्या याच जिद्दीची, संघर्षाची आणि कलेवरील निष्ठेची कहाणी उलगडण्याचे संकेत देणारा ‘फुलवरा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’ हा समर्पणाचा भाव व्यक्त करणारी ही झलक सध्या लक्ष वेधून घेत आहे.

phulwara teaser  
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. येत्या १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्यातील कलाकार, संगीत आणि कथानक याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे.
विशेष म्हणजे, टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. त्याऐवजी कलाकारांचे पाय, पायांतील घुंगरू आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कुठे आनंदाचा जल्लोष आहे, तर कुठे अडखळणारी पावले दिसतात. काही दृश्यांमध्ये रक्ताने माखलेले पायही या प्रवासातील संघर्षाची जाणीव करून देतात. देवीच्या चरणी फुलवरा अर्पण करणारे हात, ढोलकीवर थाप देणारी बोटे, तबल्यावर ताल धरणारे हात आणि त्या तालावर बेभान होऊन थिरकणारी पावले अशा दृश्यांतून लावणीच्या विश्वाचे दर्शन घडते. याला हर्ष-विजय या संगीतकार जोडीच्या संगीताची साथ लाभली आहे. या सगळ्या दृश्यांतून लावणी कलाकारांच्या आयुष्यातील मेहनत, त्याग आणि कलेप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते.
साधारण १७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने लावणी आणि तमाशाच्या विश्वाला मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे सादर केले होते. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला नवी ऊर्जा देत मनोरंजनविश्वात वेगळा ठसा उमटवला. आता पुन्हा एकदा लावणी आणि तमाशाच्या समृद्ध परंपरेचा अनुभव देण्यासाठी दिग्दर्शक रवी जाधव ‘फुलवरा’ घेऊन येत आहेत. मात्र, या चित्रपटातून केवळ रंगमंचावरील झगमगाट आणि लावणीचा ठेका दाखवण्यापेक्षा त्यामागील कलाकारांची मेहनत, त्यांची धडपड आणि कलेशी जोडलेले भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की, लावणीचा विचार केला की डोळ्यांसमोर तिचा ठेका, रंगमंचावरील ऊर्जा आणि कलाकारांची अदाकारी उभी राहते. मात्र, या प्रत्येक गोष्टीमागे अनेक वर्षांची मेहनत आणि कलेशी असलेली अतूट बांधिलकी असते. ‘फुलवरा’च्या टीझरमधून हाच भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलींच्या पायांतील घुंगरू तसेच त्यांना लागलेले रक्त आणि माती ही त्यांच्या संघर्षमय प्रवासाची प्रतीके आहेत. ‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’ ही ओळ केवळ संवाद नसून लावणी जगणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या भावनांचे प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेमागील जिद्द, प्रेम आणि ती जपण्यासाठी घेतले जाणारे कष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, हाच या चित्रपटामागील प्रामाणिक हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही चित्रपटाविषयी आपली भूमिका मांडली. मराठी लोककलेचा वारसा समृद्ध असून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. ‘फुलवरा’च्या टीझरमधून लावणीचे आकर्षक रूप तर दिसतेच, पण त्याचबरोबर या कलेसाठी आवश्यक असलेली मेहनत आणि समर्पणही अधोरेखित होते. घुंगरांचा नाद केवळ कलाकाराच्या पायांपुरता मर्यादित नसतो, तर तो त्याच्या मनातील स्वप्नांशी जोडलेला असतो. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनातून ही भावना मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे साकारली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झी स्टुडिओजच्या माध्यमातून मराठी मातीशी नाते सांगणारी आणि लोककलेचा अभिमान जागवणारी कलाकृती प्रेक्षकांना अनुभवता येणार असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
लोकसंगीताच्या क्षेत्रात वेगळ्या सादरीकरणामुळे ओळख निर्माण केलेल्या ‘द फोक आख्यान’ या समूहातील हर्ष-विजय या संगीतकार जोडीने चित्रपटाला संगीत दिले आहे. तर ‘द फोक आख्यान’चे लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत. लोकसंगीताची पारंपरिक ओळख, त्यातील अस्सलपणा आणि आधुनिक पिढीशी संवाद साधणारी मांडणी यांचा सुरेख संगम या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.
चित्रपटातील कलाकारांची नावे आणि कथानक अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे टीझरमधील दृश्यांमधून नेमकी कोणती कहाणी उलगडणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.