गस्तीवर असतानाच काळाचा घाला! पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई
ASI santosh gaikwad मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण आणि चौपदरीकरण झाल्यानंतरही या मार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. भरधाव आणि अवजड वाहनांमुळे शनिवारी रात्री उशिरा रत्नागिरीतील अंजनारी पुलाजवळ भीषण अपघात घडला. लोखंडी सळई वाहून नेणाऱ्या एका कंटेनरने वाहतूक पोलिसांच्या गस्ती वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत हातखंबा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) आणि कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. तर पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
police
 
 
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अंजनारी पूल परिसरात हातखंबा वाहतूक शाखेचे शासकीय वाहन गस्तीवर होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या लोखंडी सळईंनी भरलेल्या कंटेनरने पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पोलिसांचे वाहन थेट अंजनारी नदीच्या खोल उतारावर जाऊन पलटी झाले. धडकेनंतर नियंत्रण सुटल्याने कंटेनरही रस्त्याच्या कडेला उलटला.
ASI संतोष गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू
या अपघातात पोलीस वाहनातील दोन पोलीस अंमलदार आणि एक सहाय्यक फौजदार गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड यांची प्राणज्योत मालवली. पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कंटेनर उलटल्यानंतर त्याच्या केबिनखाली दबून चालकाचाही मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
महामार्गावर वाहतुकीचे नियमन करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचाच अशा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने पोलीस दलासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवजड वाहनांच्या भरधाव वेगामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.