शरद पवार रुग्णालयात दाखल, अचानक तब्येत बिघडली

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
पुणे
sharad pawar ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीत नेमका कोणत्या कारणामुळे बिघाड झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पवार कुटुंबीय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांकडूनही त्यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. रुग्णालयात त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
 

sharad pawar hospitalized after sudden deterioration in health 
शरद पवार यांनी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी माढा तालुक्यातील तुळशी तसेच पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली. तुळशी गावात त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.
दरम्यान, आज नियोजित असलेला त्यांचा दुष्काळी भागातील दौरा अचानक रद्द करण्यात आला. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे दौरा पुढे ढकलल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळेच दौरा रद्द झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर ते सोलापूरहून पुण्यात परतले. प्रकृतीत अधिक बिघाड जाणवल्याने त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. त्यांच्या आजाराचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे, दिवाळीनंतर शरद पवार करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. बारामती आणि भिगवण परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नियोजित दौरा रद्द झाल्याची माहिती करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी दिली होती. दिवाळीनंतर पवार करमाळ्यात निश्चितपणे पाहणीसाठी येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
या दौऱ्याच्या तयारीबाबत बोलताना नारायण पाटील यांनी आपण शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरच करमाळ्याकडे रवाना झालो होतो, असे सांगितले. दौऱ्याच्या नियोजनाची तयारीही सुरू होती, अशी माहिती त्यांनी दिली. आता दिवाळीनंतर पवार यांच्या करमाळा दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा असून, वैद्यकीय तपासण्यांनंतरच प्रकृतीचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.