सिरोंचा,
sironcha-fossil-park-visitसिरोंचा तालुक्याच्या विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी रविवारी विविध विकासकामे व शैक्षणिक संस्थांची पाहणी करून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. वडदम येथील जीवाश्म उद्यान, कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय, आदिवासी मुलींची आश्रमशाळा, तुमनूर येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच ग्रामपंचायत परिसराला त्यांनी भेट दिली.
वडदम येथील जीवाश्म उद्यानाची पाहणी करताना या ठिकाणचा भूवैज्ञानिक वारसा जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. जीवाश्मांचे संवर्धन, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा आणि परिसराच्या विकासाबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. कोलकाता येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेले डायनासोरचे जीवाश्म त्यांच्या मूळ ठिकाणी परत आणण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. मुख्य सचिवांच्या हस्ते उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय व आदिवासी मुलींच्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांनी शिक्षण, निवास व्यवस्था आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. तुमनूर येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्राचीही पाहणी करून ग्रामीण विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माहिती घेतली.
यावेळी मुख्य सचिवांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेतील अडचणी जाणून घेतल्या. तुमनूर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक विकासाच्या अपेक्षा समजून घेतल्या. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दौर्यावेळी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.