पुणे,
पुण्यातील मुकुंद नगर परिसरात २९ वर्षीय पायल पवार झांबरे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पायल यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. त्या पुण्यातील प्रसिद्ध झांबरे पॅलेसच्या मालकांच्या कुटुंबातील सून असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर त्यांच्या माहेरच्या मंडळींसह नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पायल यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संतप्त नातेवाईकांनी महर्षी नगर येथील झांबरे पॅलेसकडे धाव घेतली. सोमवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास १५ ते २० जणांच्या समूहाने या ठिकाणी जाऊन तोडफोड केली. यावेळी कार्यालयातील साहित्याचे नुकसान करण्यात आले. झांबरे पॅलेस हे पुण्यातील प्रसिद्ध मंगल कार्यालय असून, येथे विवाह सोहळे आणि विविध मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी झांबरे पॅलेस तसेच मुकुंद नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पायल यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती अद्याप तपासाधीन आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात पुढील तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.