नवी दिल्ली,
The threat of another storm बंगालच्या उपसागरात आणखी एका शक्तिशाली चक्रीवादळाने धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर आता ‘मुरासू’ नावाचे वादळ किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून, त्याची तीव्रता वाढून गंभीर चक्रीवादळात झाली आहे. हे वादळ ३ नोव्हेंबरच्या पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर राहण्याचा अंदाज असून, वादळी झोतांमुळे तो ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेऊन आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेतला असून, सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, एका आठवड्याच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी २८ ऑक्टोबर रोजी ‘अर्णब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्याचा आंध्र प्रदेश आणि ओडिशाला मोठा फटका बसला होता. या वादळामुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर हजारो झाडे आणि १५ हजार वीजखांब उन्मळून पडले होते. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुरासू’ चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी २० किलोमीटर वेगाने वायव्य दिशेने सरकले असून, त्याची तीव्रता गंभीर चक्रीवादळात झाली आहे. २ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे २.३० वाजता हे वादळ १३.६ अंश उत्तर अक्षांश आणि ८२.५ अंश पूर्व रेखांशावर केंद्रित होते. त्यावेळी ते तमिळनाडूतील चेन्नईपासून पूर्व-ईशान्य दिशेला सुमारे २६० किलोमीटर अंतरावर होते. आंध्र प्रदेशातील नेल्लोरपासून पूर्व-दक्षिण-पूर्वेला २९० किलोमीटर, मछलीपट्टणमपासून दक्षिण-दक्षिण-पूर्वेला ३२० किलोमीटर, कावलीपासून पूर्व-दक्षिण-पूर्वेला ३१० किलोमीटर आणि ओंगोलपासून दक्षिण-दक्षिण-पूर्वेला ३३० किलोमीटर अंतरावर होते. तर विशाखापट्टणमपासून त्याचे अंतर दक्षिणेकडे ४७० किलोमीटर होते. ‘मुरासू’ हे नाव भारताने सुचवलेल्या चक्रीवादळांच्या नामसूचीतील असून, तमिळ भाषेत त्याचा अर्थ युद्धाचा नगारा असा होतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे सरकत २ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० ते ३ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजेदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान ओंगोलजवळ गंभीर चक्रीवादळाच्या स्वरूपात ते किनारा ओलांडू शकते. यावेळी ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, वाऱ्यांचे झोत ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील भागांमध्ये प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. यापूर्वीच्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांसाठी ‘मुरासू’चे संकट आणखी चिंतेचे ठरत आहे.