अमरावती न्यायालय बॉम्बने उडविण्यची धमकी

पोलिसांनी केला परिसर निर्मनुष्य

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
अमरावती
threat-to-blow-up-amravati-court येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश एका ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. न्यायालय प्रशासनाने तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाच्या मुख्य इमारतीसह इतर विभागांतील न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या पक्षकारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. पोलिस यंत्रणेला धावपळ करावी लागली.राज्यातील बीड, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे. अमरावतीतही अशाच प्रकारचा ई-मेल प्राप्त झाल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त श्याम घुगे, यशवंत सोळंके यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी आणि जलद प्रतिसाद पथक न्यायालय परिसरात पोहोचले. बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाने संपूर्ण परिसराला घेराव घातला.
 

amravati court
पोलिसांनी न्यायालयाच्या पाच मजल्यांवरील प्रत्येक दालनाची तपासणी सुरू केली. इमारतीचे प्रवेशद्वार बंद करून प्रत्येक कोपरा, वाहनांचे पार्किंग, संशयित बॅगांची तपासणी हाती घेण्यात आली. अग्निशमन दलाचे वाहनही घटनास्थळी दाखल झाले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे न्यायालयात उपस्थित असलेल्या वकील आणि पक्षकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्राप्त झाल्याची माहिती आहे. न्यायालयाच्या जवळच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय कार्यालये असल्याने या घटनेविषयी चर्चा सुरू झाली. हा ई-मेल कोणी आणि कोठून पाठवला. हा एखाद्या कटाचा भाग आहे का किंवा खोडसाळपणा, याबाबत पोलिस अथवा न्यायालय प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. केवळ बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश न्यायालयाला प्राप्त झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सायबर सेलच्या मदतीने सुगावा शोधण्याचे काम सुरू आहे.