मुंबई
tv actor anuj thakur हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वाला धक्का बसलेला असतानाच, आता टेलिव्हिजन क्षेत्रातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील विविध लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता अनुज ठाकूर याचे वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी निधन झाले आहे. निरोगी जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुजचा अचानक मृत्यू झाल्याने त्याचे चाहते, मित्रपरिवार आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे.
अनुजच्या निधनाची माहिती त्याचा जवळचा मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर रुपेश सोनार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. रुपेश यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुजसोबतचा एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली. अनुज आता आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे त्यांनी म्हटले. अनुज आपल्यासाठी लहान भावाप्रमाणे होता. भविष्यात अनेक प्रोजेक्ट्स एकत्र करण्याचे दोघांनी ठरवले होते. अनुजने सुरुवातीच्या काळात केलेला संघर्ष आपण जवळून पाहिला होता, असेही रुपेश यांनी नमूद केले. आयुष्य किती अनिश्चित असू शकते, याची जाणीव या घटनेने झाल्याचे सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अनुजचे निधन साधारण तीन दिवसांपूर्वी झाले होते. त्याच्या मृत्यूचे कारण सांगताना रुपेश सोनार यांनी झोपेत असतानाच त्याला फिट आल्याची माहिती दिली. रोजच्या दिनक्रमानुसार पहाटे साडेचार वाजता अनुजच्या मोबाईलचा अलार्म वाजला. त्यानंतर त्याची आई त्याला उठवण्यासाठी खोलीत गेली. मात्र, अनुजच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉक्टरांना बोलावून तपासणी करण्यात आली असता त्यांनी अनुजला मृत घोषित केले.
अनुज ठाकूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘धूम मचाओ धूम’, ‘बंधन सात जन्मों का’, ‘बींद बनूंगा घोडी चढूंगा’ आणि ‘महिसागर’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्याच्या अचानक निधनाने हिंदी टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली असून, चाहते आणि सहकलाकारांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, मराठी चित्रपट ‘गोंधळ’च्या ऑस्कर एन्ट्रीवर अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या अभिमानाबाबतची त्यांची भावना यासंबंधीची बातमीही चर्चेत आहे.