सिगारेट ओढण्याच्या वादातून इसमाचा खून

देवळीतील इंदिरानगर परिसरातील घटना

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |

देवळी,
wardha-dhaba-dispute-murderमोहित धाबा येथे सिगारेट ओढण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसन खुनात झाल्याची घटना शहरातील इंदिरानगर परिसरात घडली. गजानन किशोर पाटणकर (४२), रा. देवळी असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी देवळी पोलिसांनी तपास चक्र फिरवीत पाच संशयितांना ताब्यात घेतले. ही घटना २ रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.
 
cigata
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक गजानन पाटणकर आणि आरोपी यांच्यात वर्धा रोडवरील मोहित धाबा येथे सिगारेट ओढण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर गजानन आपल्या मित्राला सोडायला सहकार्‍यांसह इंदिरानगर परिसरात गेला असता आरोपींनी त्यांची वाट अडवली. काही आरोपींनी गजाननला पकडून चाकू, खंजिरने सपासप वार केले. जखमा खोलवर असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात रतस्त्राव झाल्याने गजाननचा मृत्यू झाला.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता वर्धा येथील रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी विकी किशोर पाटणकर यांच्या तक्रारीवरून अमन टेकाम, ओम सावरकर, प्रणय राठोड, मनोज राठोड आणि एक अल्पवयीन सर्व रा. देवळी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.