चालक गाडीत, नो पार्किंगचे चलन हातात!

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
वर्धा,
wardha no parking fine news वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, नियमांची अंमलबजावणी करताना तारतम्यही बाळगायला नको का? शहरातील पतंजली औषधालयात वैद्य म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा असाच काहीसा अनुभव आला.काल सकाळी ११ वाजताच्या सुमारास संबंधित महिला कामावर रुजू होण्यासाठी औषधालयात आल्या. त्यांनी औषधालयासमोर आपले वाहन उभे केले. थंब इम्प्रेशनद्वारे हजेरी लावण्यासाठी त्या वाहनातून खाली उतरत असतानाच वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना ५०० रुपयांचे चलन दिले. विशेष म्हणजे, चलनावर दंडाचे कारण म्हणून 'नो पार्किंग' असा उल्लेख करण्यात आला आहे.
 
 
 
ardha
 
 
या घटनेतील महत्त्वाची बाब म्हणजे वाहनात चालक उपस्थित असतानाच ही कारवाई करण्यात आली. संबंधित महिला केवळ हजेरी लावण्यासाठी वाहनातून उतरल्या होत्या. अशा परिस्थितीत नो पार्किंगचा नियम नेमका कोणत्या आधारावर लावण्यात आला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नो पार्किंगच्या नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र, नियमांची अंमलबजावणी करताना परिस्थितीचा विचार होणेही गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई केली म्हणून ती योग्यच, असे मानायचे का? की कारवाईच्या पद्धतीबाबतही प्रश्न विचारायचे? या घटनेमुळे वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी महिला वैद्य यांनी महिला वाहतूक पोलिसांरोधात ऑनलाईन तक्रार केल्याची माहिती आहे.