चंद्रपूरच्या बाल सुधारगृहातून 6 मुलींचे पलायन

हिंगणघाटमध्ये लागला शोध

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
चंद्रपूर,
chandrapur चंद्रपूर शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील बालसुधारगृहातून 6 अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची घटना 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. माहिती कळताच रामनगर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी पहाटे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
 
 
 
चंद्रपूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील बालसुधारगृहात 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.20 वाजताच्या सुमारास 6 अल्पवयीन मुली दाखल झाला. या अल्पवयीन मुलींपैकी एका मुलीने काचेचा ग्लास फोडून त्याचा तुकडा हातात घेत सुरक्षा रक्षकाला जवळ आल्यास मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या मुलीसह अन्य 5 अल्पवयीन मुलींनी बालसुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. याप्रकरणी सुरक्षा रक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाही मुलींचा तातडीने शोध घेण्याकरिता पोलिसांचे सहा स्वतंत्र पथके तयार करण्यात आले. चंद्रपूर शहरातील विविध ठिकाणांवरील एकूण 35 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासून मुलींच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला.
 
  
सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण, तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्ष शोधमोहीम आणि गोपनीय माहितीचे संकलन या सर्व बाबींचा समन्वय साधून पोलिसांनी शोधकार्य सुरू ठेवले. दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजातच्या सुमारास या 6 अल्पवयीन मुली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांची दोन पथके तातडीने हिंगणघाटकडे रवाना करण्यात आली. हिंगणघाट पोलिसांच्या मदतीने व महिला पोलिस अंमलदारांच्या सहाय्याने हिंगणघाट येथील रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात आला. त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी चंद्रपूर येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या शोधमोहिमेत रामनगर पोलिस पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभवती एकुरके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोलाचे सहकार्य केले.