भजनलाल यांच्या जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का!

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
जयपूर,
bhajanlals-district राजस्थानमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, भरतपूर जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला मागे टाकत मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या जिल्ह्यातच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भरतपूर जिल्हा परिषदेच्या एकूण ३१ जागांपैकी काँग्रेसने तब्बल २१ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे भाजपला नऊ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या (आरएलपी) उमेदवाराने एका जागेवर बाजी मारली.
 
bhajanlals-district
 
भरतपूर जिल्हा परिषदेत ३१ प्रभाग असून, जिल्ह्यात सात पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेतली असली, तरी पंचायत समित्यांच्या निकालात अपक्ष उमेदवारांनीही अनेक ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांसमोर स्थानिक पातळीवर सत्ता स्थापनेचे आव्हान निर्माण होऊ शकते.
 
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या संगीता, राधा, सतीवीर, मिथिलेश, पूजा कुमारी, मीरा देवी, मानसिंग, दिनेश भटारा आणि रघुवीर सिंह यांनी विजय मिळवला. तर काँग्रेसच्या राजेश, अरविंद, चेतन, हरिसिंग, हरबीर सिंग, हिराचंद, सावित्री देवी, अशोक, सपना, प्रमोद, रानुवाला, सरोज, हरप्यारी, राजेश, अंजू कुमारी, सुमन गुर्जर, रेखा कुमारी, ओमवती, सावित्री आणि बोडन सिंग यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला. आरएलपीच्या रेणू कुमारी यांनी प्रभाग क्रमांक २६ मधून विजय मिळवला.
 
मागील निवडणुकीत भाजप आघाडीवर
विशेष म्हणजे, मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भरतपूरमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आघाडी घेतली होती. त्यावेळी भाजपला १७, तर काँग्रेसला १४ जागा मिळाल्या होत्या. अपक्ष उमेदवारांनी चार जागांवर विजय मिळवला होता. बहुजन समाज पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या, तर उर्वरित जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदलले असून, काँग्रेसने भाजपला मागे टाकत जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.