वाशीम,
ravi-marshetwar शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढणारा उत्पादन खर्च, रासायनिक खतांचा अतिवापर आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होणार्या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. याच उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते तथा देशी गोपालक रवि मारशेटवार यांच्या पुढाकारातून १९ नोव्हेंबर रोजी खरोळा येथील प्रगतिशील शेतकरी दीपक वारकड यांच्या सेंद्रिय विषमुक्त शेतीला कृषी भेट आयोजित करण्यात आली.

यावेळी रवि मारशेटवार यांनी शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी खर्चात दर्जेदार शेती कशी करता येते, याची प्रत्यक्ष माहिती दिली. शेतकर्यांसाठी विशेष आकर्षण ठरले ते अॅनारोबिक बॅगच्या माध्यमातून तयार करण्यात येणारे प्रगत जीवामृत या तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने जीवामृत तयार करणे, त्याचे गाळणीकरण करणे आणि पिकांच्या वाढीसाठी त्याचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक रवि मारशेटवार यांनी शेतकर्यांना समजावून सांगितले. रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी खरोळा येथील शेतकरी विष्णू ठाकरे यांनी नव्याने लागवड केलेल्या इराणी अक्कलखोडा पिकाची पाहणी करण्यात आली.
या एक एकर क्षेत्रातील पिकाला आतापर्यंत चार तोडे झाले असून, पुढील महिनाभर आणखी उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. या पिकाचा कालावधी साधारणतः सहा महिन्यांचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेष म्हणजे या सहलीत सहभागी झालेल्या दहा शेतकरी बांधवांच्या येण्या-जाण्याचा संपूर्ण प्रवास खर्च मारशेटवार परिवाराच्या वतीने करण्यात आला. शेतकर्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सेंद्रिय व विषमुक्त शेतीचे प्रयोग करावेत, या उपक्रमातून शेतकर्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.