ai-child-abuse-content-riseचाईल्डलाईट ग्लोबल चाईल्ड सेफ्टी इ्स्टिटट्यूटच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, एआय वापरून तयार केलेल्या बाल लैंगिक शोषणाच्या साहित्याच्या तक्रारींमध्ये दोन वर्षांत ८,४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आयडब्ल्यूएफची आकडेवारीही धक्कादायक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एडिनबर्गस्थित चाईल्डलाईट ग्लोबल चाईल्ड सेफ्टी इ्स्टिटट्यूटच्या नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या बाल लैंगिक शोषणाच्या साहित्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
२०२३ मध्ये अशा अंदाजे ४,७०० तक्रारी होत्या. २०२५ मध्ये ही संख्या ४,००,००० पेक्षा जास्त झाली. ही आकडेवारी अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन’ला तंत्रज्ञान कंपन्यांनी सादर केलेल्या अहवालांवर आधारित आहे. यात डीपफेक आणि डिफेस्ड अॅप्स वापरून तयार केलेल्या सामग्रीचा समावेश आहे. या प्रतिमा बनावट असूनही मुलांकडून पैसे किंवा अधिक फोटोंची मागणी करण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्याकरिता वापरल्या जाऊ शकतात.हे संशोधन प्रामुख्याने पूर्व आशिया आणि पॅसिफिक, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन आणि उत्तर अमेरिका यावर लक्ष केंद्रित करते. यापूर्वी पश्चिम युरोपमध्ये अभ्यास करण्यात आले आहेत.
इंटरनेट वॉच फाऊंडेशन डेटा
गेल्या महिन्यात यूके-स्थित इंटरनेट वॉच फाऊंडेशनच्या एका अहवालात असेही म्हटले आहे की, अशा एआय-निर्मित सामग्रीचे प्रमाण ऑनलाईन वाढत आहे. केवळ २०२६ च्या पहिल्या सहामाहीत मागील संपूर्ण वर्षापेक्षा जास्त फोटोरिअलिस्टिक सामग्री आढळली. आयडब्ल्यूएफने या वर्षी आतापर्यंत ६,३१० एआय प्रतिमा तपासल्या आहेत, जी गेल्या वर्षीच्या ४,५०० पेक्षा जास्त प्रतिमांच्या तुलनेत ४० टक्के वाढ दर्शवते.
मुलांवरील परिणामांचे अंदाज
चाईल्डलाईटच्या अंदाजानुसार, जगभरातील ३० कोटींहून अधिक मुले दरवर्षी किमान एकदा तरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लैंगिक शोषण किंवा छळाला बळी पडतात. जवळपास चारपैकी एक मूल वयाच्या १८ वर्षांपूर्वी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या छळाचा अनुभव घेते.
प्रत्यक्ष लैंगिक छळाच्या बाबतीत उत्तर अमेरिकेतील जवळपास एक तृतीयांश मुली आणि १० पैकी एकापेक्षा जास्त मुलांनी बालपणात प्रत्यक्ष लैंगिक छळाचा अनुभव घेतला आहे. यात लैंगिक हल्ला, बलात्कार आणि स्कर्ट उचलून पाहणे (अपस्कर्टिंग) यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
अहवालांमध्ये वाढ. अमेरिकेत २०२४ ते २०२५ दरम्यान बाल लैंगिक शोषणाच्या साहित्याशी संबंधित अहवाल आणि सूचनांमध्ये ६३ टक्क्यांनी वाढ झाली. कॅनडामध्ये ही वाढ १८ टक्के होती.
तज्ज्ञांचे भाष्य
चाईल्डलाईटच्या जागतिक डेटा संचालक, प्रोफेसर डेबी फ्राय म्हणाल्या की, ही आकडेवारी बाल लैंगिक शोषणाची व्याप्ती दर्शवते. एआयमुळे धोके किती वेगाने बदलत आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला. सुधारित शोध आणि अहवाल प्रणाली या वाढीमागे एक घटक असू शकते; परंतु सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी या नवीन प्रकारांना समजून घेण्यासाठी आणि रोखण्यासाठी त्वरित कृती करणे आवश्यक आहे.
चाईल्डलाईटचे मुख्य कार्यकारी पॉल स्टॅनफिल्ड म्हणाले की, लाखो मुलांचे लैंगिक शोषण होत आहे. हे नुकसान कोठे होत आहे आणि कोणाला सर्वाधिक धोका आहे, याचे अपूर्ण चित्र सरकारकडे असते. ते सरकारांना आवाहन करीत आहेत की, याला एक टाळता येण्याजोगी सार्वजनिक आरोग्य आणिबाणी म्हणून हाताळावे.