चेन्नई,
tirupparankundram-hill तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुप्परनकुंद्रम टेकडीवरील कार्तिक दीपम प्रज्वलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबर रोजी टेकडीवरील पारंपरिक दीपस्तंभावर दीप प्रज्वलित करण्यास सशर्त मंजुरी दिली आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यासोबतच मद्रास उच्च न्यायालयाने दीपप्रज्वलनाची परंपरा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशातील काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
दीपप्रज्वलनाची प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी, यासाठी न्यायालयाने प्रशासनावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. मदुराईचे जिल्हाधिकारी मंदिराचे कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून दीप लावण्यासाठी जाणाऱ्या पथकातील सदस्यांची संख्या निश्चित करतील. संपूर्ण व्यवस्थेवर प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे. पोलिसांना सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली असून, आवश्यकता भासल्यास केंद्रीय राखीव पोलीस दलाचीही मदत घेतली जाऊ शकते.
या धार्मिक विधीसाठी केवळ अधिकृत कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनाच टेकडीवर प्रवेश असेल. यावेळी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक जमाव, मिरवणूक, आंदोलन किंवा घोषणाबाजी करता येणार नाही. दीपप्रज्वलन पूर्ण झाल्यानंतर संबंधित पथकाने आपले सर्व साहित्य घेऊन तातडीने परतणे बंधनकारक असेल. तसेच टेकडीवर कोणत्याही प्रकारचे खोदकाम, बांधकाम किंवा संरचनेत बदल करण्यास मनाई करण्यात आली आहे. पारंपरिक धार्मिक स्थळांवरील पूजा आणि जवळच्या दर्गा तसेच मशिदींमधील नागरिकांचा प्रवेश पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, ही परवानगी तात्पुरत्या स्वरूपाची असून, त्यातून कोणताही पारंपरिक हक्क निश्चित होत नाही.
काय आहे कार्तिक दीपम उत्सव?
कार्तिक दीपम हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. या दिवशी घरांची स्वच्छता करून प्रवेशद्वारावर तांदळाच्या पिठाने पारंपरिक रांगोळी काढली जाते. घरातील दरवाजे, खिडक्या, बाल्कनी आणि देवघरात मातीचे दिवे लावून परिसर प्रकाशमय केला जातो. या उत्सवानिमित्त तांदळाचे पीठ, गूळ आणि वेलची यांपासून 'माविलक्कू' हा गोड नैवेद्य तयार केला जातो. त्यामध्ये छोटा दिवा प्रज्वलित करण्याचीही परंपरा आहे. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन पूजा करतात, भक्तिगीते म्हणतात आणि भोजनाचा आनंद घेतात.
काय आहे तिरुप्परनकुंद्रम टेकडीवरील वाद?
तिरुप्परनकुंद्रम टेकडी ही भगवान मुरुगन यांच्या सहा प्रमुख पवित्र स्थानांपैकी एक असून, येथे प्राचीन खडकात कोरलेले मंदिर आहे. त्याच टेकडीवर एक दर्गाही आहे. मंदिर आणि दर्ग्याशी संबंधित वादाला १९२० पासून सुरुवात झाली. टेकडीच्या मालकीवरून निर्माण झालेल्या या वादात न्यायालयीन प्रक्रियेनंतर प्रिव्ही कौन्सिलने कायम ठेवलेल्या दिवाणी न्यायालयाच्या निर्णयानुसार, दर्ग्याशी संबंधित काही भाग वगळता टेकडी मंदिराच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्या निर्णयात दीपम प्रज्वलनाच्या परंपरेबाबत कोणताही उल्लेख नव्हता.
१९९४ मध्ये एका भक्ताने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दीपप्रज्वलनाचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. मंदिराजवळील उचिप्पिल्लैयार कोविल मंडपाजवळ दीप लावण्याऐवजी टेकडीवरील दर्ग्याच्या परिसरातील दीपस्तंभावर हा विधी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर १९९६ मध्ये उच्च न्यायालयाने दीपम पारंपरिक ठिकाणी, म्हणजेच मंडपाजवळच प्रज्वलित करण्याचे निर्देश दिले होते. या विधीसाठी कोणते ठिकाण मान्यताप्राप्त आहे, याबाबतचा तो एकमेव न्यायालयीन आदेश असल्याचे सांगितले जाते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे या प्रकरणाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.