काठमांडू,
balen-shah नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बलेंद्र शाह लवकरच भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार असून, या भेटीत भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून २२ ते २३ नोव्हेंबरदरम्यान त्यांचा हा भारत दौरा होणार आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याने त्याकडे विशेष लक्ष लागले आहे.
नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी शुक्रवारी या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. बलेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखाली ३४ सदस्यांचे सरकारी शिष्टमंडळ भारतात येणार असून, नवी दिल्लीत विविध महत्त्वाच्या विषयांवर उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. या दौऱ्यात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बलेंद्र शाह यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या चर्चेनंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत. तसेच द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर करार करण्यात येणार असून, त्यांची अधिकृत देवाणघेवाणही केली जाईल.
या बैठकीनंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चर्चेतील महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती देतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडून बलेंद्र शाह यांच्या सन्मानार्थ विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान नेपाळचे पंतप्रधान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.
दिल्ली दौऱ्यात बलेंद्र शाह राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहणार आहेत. याशिवाय भारत आणि नेपाळमधील व्यापार तसेच आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नेपाळ-भारत व्यवसाय मंचाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत.
भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांना ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी आहे. १९५० मध्ये झालेला शांतता आणि मैत्री करार तसेच दोन्ही देशांमधील १ हजार ७५१ किलोमीटर लांबीची खुली सीमा या संबंधांचा महत्त्वाचा आधार आहे. दोन्ही देशांमधील कौटुंबिक आणि सामाजिक जवळीक 'रोटी-बेटी'च्या नात्याने ओळखली जाते. आता नेपाळमधील नव्या राजकीय नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.