गोंदिया,
burglary-case बंद घराला लक्ष्य करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणार्या दोन आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. यश धमेन्द्र वासनीक (१९) रा. लुंबिनी चौक, कुंभारेनगर आणि उदय ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय (२२) रा. नाना चौक, कुंभारेनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सावित्रीबाई फुले वार्डातील कुंभारेनगर, लाल पहाडी परिसरातील रहिवासी जितेंद्र हरिचंद बागडकर हे १० नोव्हेंबर रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते घरी परतले असता घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातील सोन्याचा एक जोड झाला व १० हजार रुपये रोख असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी यश वासनीक आणि उदय उपाध्याय यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. दरम्यान, दोघांनाही अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेला १२ हजार रुपये किमतीचा सोन्याचा एक जोड झाला जप्त करण्यात आला आहे. मात्र, १० हजार रुपयांची रोख रक्कम अद्याप हस्तगत व्हायची आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.