म्हैसूर पाक प्रकरणी कोराडी मंदिर संस्थानाचे स्पष्टीकरण!

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांचे अधिकृत स्पष्टीकरण

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
नागपूर,
koradi-temple-trust-regarding-the-mysore-pak-issue अन्नछत्रातील म्हैसूर पाक प्रकरणाशी मंदिर संस्थानाचा थेट संबंध नाही; वस्तुस्थिती जाणून न घेता संस्थानाची बदनामी करू नये – मंदिर प्रशासनाचे आवाहनकोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अन्नछत्राचे संचालन करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर म्हैसूर पाकच्या नमुन्याबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केलेल्या कारवाईसंदर्भात मंदिर प्रशासनाच्या वतीने वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येत आहे.
 
koradi-temple
 
सर्वप्रथम हे स्पष्ट करण्यात येते की, सदर म्हैसूर पाक मंदिराच्या अन्नछत्रामध्ये तयार करण्यात आलेला नव्हता. संबंधित म्हैसूर पाक वेंडर ने तो बाहेरून तयार स्वरूपात (रेडीमेड) प्रसाद म्हणून आणला होता. या म्हैसूर पाकमध्ये सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या खाद्य रंगाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित कंत्राटदाराच्या परवान्याच्या निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे ही कारवाई संबंधित बाहेरून आणलेल्या अन्नपदार्थाच्या नमुन्याशी आणि संबंधित कंत्राटदाराच्या परवान्याशी निगडित असून, मंदिर संस्थानाच्या अन्नछत्रातील नियमित भोजननिर्मितीशी त्याचा संबंध नाही.
 
मंदिर प्रशासन हे विशेषत्वाने स्पष्ट करू इच्छिते की, संस्थानाच्या अन्नछत्रामध्ये म्हैसूर पाक तयार केला जात नाही. अन्नछत्रामध्ये दररोज भाविकांसाठी ताजे, सात्त्विक आणि स्वच्छ भोजन तयार करून वाढण्यात येते. यामध्ये भाजी, पोळी, वरण, भात तसेच गोड पदार्थ म्हणून शिरा अशा भोजनाचा समावेश असतो. भाविकांना दर्जेदार व सुरक्षित भोजन उपलब्ध करून देण्यास संस्थान नेहमीच प्राधान्य देते.
 
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मंदिर प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध आवश्यक प्रशासकीय कारवाई केलेली आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराने FDA च्या कारवाईविरोधात मा. आयुक्त महोदयांकडे नियमानुसार अपील दाखल केलेले असून, सदर प्रकरणाची प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे.
 
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे एका विशिष्ट बाहेरून आणलेल्या अन्नपदार्थाच्या नमुन्याबाबत झालेल्या कारवाईचा संबंध थेट मंदिराच्या अन्नछत्रातील भोजन व्यवस्थेशी जोडणे किंवा संपूर्ण मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही. वस्तुस्थितीची पूर्ण माहिती न घेता अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे संस्थानाची प्रतिमा मलिन होत असून, लाखो भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचण्याची शक्यता आहे.
 
मंदिर प्रशासन भाविकांच्या आरोग्याशी, अन्नाच्या गुणवत्तेशी आणि स्वच्छतेशी कोणतीही तडजोड करणार नाही. अन्नछत्रातील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि पुरवठा व्यवस्थेवर आवश्यक देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून, यापुढेही त्याबाबत योग्य ती दक्षता घेतली जाईल. तरी प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेऊनच बातम्या प्रसारित कराव्यात. तसेच भाविकांनी कोणत्याही अपुऱ्या माहितीवर किंवा गैरसमजावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.