अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना सिंलेंडरचा स्फोट, दोघे गंभीर

रहमत नगर येथील घटना

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
चंद्रपूर,
cylinder-explodes-during-illegal-gas-refilling-two घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधरीत्या गॅस भरण्याचा धोकादायक प्रकार चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात दोन युवकांच्या जीवावर बेतला आहे. या जीवघेण्या प्रकारात अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन जण गंभीररित्या भाजले आहेत. ही थरारक घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
 
 
cylinder-explodes-during-illegal-gas-refilling-two
 
रहमतनगर परिसरातील मसीहा लॉन्सजवळ असलेल्या एका घरात गुरुवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. कोणतीही सुरक्षितता न बाळगता सुरू असलेल्या या बेकायदा रिफिलिंगदरम्यान अचानक गॅसचा भडका उडून सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे क्षणात संपूर्ण घरात आगीचे लोळ उसळले आणि तेथे उपस्थित दोन युवक या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. स्फोटाचा मोठा आवाज आणि आगीच्या घटनेमुळे रहमतनगर परिसरात काही काळ घबराट व खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत गंभीर भाजलेल्या दोन्ही युवकांना तातडीने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र दोघांचेही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
 
 
जखमी झालेले दोघेही रिफिलिंगचे काम करणारे कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अवैध गॅस रिफिलिंग करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात सुरू असलेल्या अशा अवैध गॅस रिफिलिंगच्या प्रकारांमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत असून, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.