मुंबई,
esha-and-bharat-back-together बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा माजी पती भरत तख्तानी पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने मनोरंजन विश्वात चर्चांना उधाण आले आहे. ईशाच्या आगामी 'प्रताप' चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला भरतने हजेरी लावली. यावेळी ईशाची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी तसेच बहीण अहना देओलही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही ईशा आणि भरत यांनी एकत्र कुटुंबासोबत फोटोसाठी पोझ दिली.
गुरुवारी मुंबईत 'प्रताप' चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी ईशा सोनेरी रंगाच्या आकर्षक रेशमी साडीत उपस्थित होती. तर भरत कॅज्युअल लूकमध्ये दिसला. हेमा मालिनी यांनी पीच-गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. कार्यक्रमात भरतने ईशा आणि तिच्या कुटुंबीयांसोबत छायाचित्रे काढली. मात्र, कौटुंबिक फोटोसाठी पोझ देताना हेमा मालिनी काहीशा संकोचलेल्या दिसल्याने त्यांच्या हावभावांचीही चर्चा झाली.
ईशा आणि भरत यांची ओळख शालेय जीवनापासूनची आहे. मुंबईत एका आंतरशालेय स्पर्धेदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. भरतने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, तो अवघ्या १३ वर्षांचा असताना ईशाच्या प्रेमात पडला होता. त्याने ईशाला आपले पहिले प्रेमही म्हटले होते. मात्र, किशोरवयात त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही आणि काही काळ त्यांच्यात संवादही नव्हता. अनेक वर्षांनंतर पुन्हा भेट झाल्यावर त्यांनी नात्याला सुरुवात केली. अखेर २९ जून २०१२ रोजी मुंबईतील इस्कॉन मंदिरात दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धतीने दोघे विवाहबंधनात अडकले.
विवाहानंतर ईशा आणि भरत यांना दोन मुली झाल्या. २०१७ मध्ये राध्या, तर २०१९ मध्ये मिराया यांचा जन्म झाला. तब्बल ११ वर्षांहून अधिक काळ संसार केल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. संयुक्त निवेदनातून त्यांनी हा निर्णय सामंजस्याने घेतल्याचे स्पष्ट केले होते. तसेच मुलींचे संगोपन आणि त्यांचे आनंदी आयुष्य हेच आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही सांगितले होते.
विभक्त झाल्यानंतरही ईशा आणि भरत यांच्यात कटुता निर्माण झाल्याचे दिसून आले नाही. मे २०२६ मध्ये दोघे मित्रांसोबत भोजनासाठी एकत्र आले होते. त्याचप्रमाणे या महिन्याच्या सुरुवातीला दिवाळीच्या कार्यक्रमातही ते एकत्र दिसले होते. दुसरीकडे, भरतने २०२५ मध्ये दुबईस्थित उद्योजिका मेघना लखानी हिच्यासोबतचे नाते सार्वजनिक केले होते. माद्रिद दौऱ्यातील छायाचित्र शेअर करत त्याने मेघनाचा आपल्या कुटुंबाचा एक भाग म्हणून उल्लेख केला होता.
दरम्यान, ईशाचा 'प्रताप' हा ॲक्शन-ड्रामा थ्रिलर चित्रपट सचिन सराफ यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात ईशासोबत अमित साधही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रताप रानडे आणि त्याच्याभोवती रचण्यात आलेल्या मोठ्या कटावर चित्रपटाची कथा आधारित आहे. ईशा या चित्रपटात पूनमची भूमिका साकारत असून, २० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.