वाशीम,
bhaskar-pere-patil मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामपंचायतींसाठी आपल्या गावाचा विकास साधण्याची आणि कामगिरी सिद्ध करण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. या अभियानात वाशीम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरावर पुरस्कार मिळवावा, या दृष्टीने सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लागावे, असे आवाहन पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२६-२७ अंतर्गत जिल्हा परिषद वाशीमच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होते. स्थानिक वाटाणे लॉन्स येथे आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी सुखदेव जाधव, शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक गजानन खुळे, जिल्हा कृषी अधिकारी अभिजीत देवगिरकर यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामपंचायतींनी केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी न करता गावाच्या गरजा ओळखून विकासाचे नियोजन करावे. गावातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, लोकसहभाग आणि शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे या बाबींना प्राधान्य द्यावे. ग्रामपंचायतींच्या कामात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढवून गावाच्या विकासाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत सुरुवातीला उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे ग्रामपंचायत स्तरावर करावयाचे नियोजन, कामांचे दस्तऐवजीकरण, विकासकामांची अंमलबजावणी आणि अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची कामगिरी उंचावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात केले. पुरुषोत्तम बाबा व्यसनमुक्ती कलापथकाचे शाहिर केशव डाखारे, कवि-गायक जनार्धन भालेराव आणि लोककवि प्रज्ञानंद भगत यांनी पाणी, स्वच्छता, व्यसनमुक्ती ई. विषयावर गीत गायनाने अभियानाबाबत जनजागृती केली. जलजीवन मिशन अंतर्गत गावांची यशोगाथा व पाणी टंचाईबाबत उपाययोजना याविषयी पुष्पलता अफुने यांनी माहिती दिली. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी भाऊराव बेलखेडकर यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची उद्दिष्टे, अभियानातील विविध निकष याबाबत पीपीटी च्या साह्याने माहिती दिली.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रशासन अधिकारी अमोल कापसे, प्रविण राऊत, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मिसाळ व पंचायत विभागाच्या इतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन नेहा काळे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक गट विकास अधिकारी गजानन खुळे यांनी केले.