नवी दिल्ली,
india-fugitive-criminals-crackdownविदेशात लपलेल्या गुन्हेगारांवर भारत आता पकड घट्ट करण्याची तयारी करत आहे. दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या जाळ्यांना मुळापासून उखडून टाकण्यासाठी विदेशात लपलेल्या गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थिती परत आणले जाईल. दहशतवादाचे धोके पूर्णपणे संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य, केंद्रीय यंत्रणा व राज्य पोलिसांमध्ये उत्तम समन्वय आवश्यक असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
राजधानी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) दहशतवादविरोधी परिषदेच्या उद्घाटनानंतर संबोधित करताना शाह यांनी सांगितले की, देशाच्या सीमेत गुन्हे करून परदेशातून टोळी चालणारे रडारवर आहे. सीमेबाहेर कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध समन्वित कारवाई आवश्यक आहे. परदेशात असलेले गुन्हेगार सीमापार तस्करी, गुन्हेगारी कारवाया आणि देशांतर्गत त्यांच्या साथीदारांशी संपर्क ठेवण्यात भूमिका बजावू शकतात. अशा गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी इतर देशांशी सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या सीमेबाहेर कार्यरत असलेल्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यासाठी स्थानिक पोलिस आणि केंद्रीय संस्थांनी एकत्र काम केले पाहिजे. २०१९ पासून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३६ देशांतून तब्बल ३०३ फरारी गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात आले. दहशतवादाची संपूर्ण साखळी मोडून काढायची असेल, तर त्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर थेट प्रहार करणे आवश्यक आहे.
स्थानिक दहशतवाद्यांपासून काश्मीर मुक्त
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कामाख्यापर्यंत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एक समान रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे, ही व्यवस्था थेट देशातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या स्तरापर्यंत कार्यान्वित केली जात आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी लतीफ भट याच्या खात्म्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी संपूर्ण काश्मीर खोरे स्थानिक दहशतवाद्यांपासून पूर्णपणे मुक्त झाल्याचे शाह म्हणाले. भारत हा दीर्घकाळापासून दहशतवादाचा बळी ठरला आहे आणि आपण अत्यंत खंबीरपणे या संकटाचा सामना करत आहोत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भट्टीचे ४० पेक्षा जास्त मोड्युल्स उद्ध्वस्त
बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत शहजाद भट्टीचे देशभरातील ४० पेक्षा जास्त मोड्युल्स उद्ध्वस्त करण्यात आले असून, १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल करत २७१ जणांना अटक करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (पीएफआय) जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय पोलिसांच्या संयुक्त कारवाईचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. एकाच रात्रीत ११ राज्यांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई करत पीएफआयचे कंबरडे मोडले. यामुळे भविष्यात देशासमोर उभी राहणारी मोठी संकटे वेळीच टळली, असे शाह म्हणाले.
सुरक्षेसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारा
दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच दहशतवाद्यांना अटक करून गजाआड करणे, हीच कोणत्याही यशस्वी तपास यंत्रणेची खरी ओळख असते. सर्व राज्यांच्या पोलिसांनी या कार्यपद्धतीचा अभ्यास करून ती आपापल्या भागात लागू करावी, असे आवाहन शाह यांनी केले. सीमा सुरक्षेसाठी नवा सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारणे, सीमेवरील बेकायदेशीर धार्मिक बांधकामे पूर्णपणे हटवणे आणि आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढवणे, अशा सर्वच आघाड्यांवर सरकारने एकाच वेळी प्रभावी काम केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.