मुंबई,
Maharashtra Weather Alert'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांमध्ये पुढील चार आठवड्यांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 19 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत देशाच्या विविध भागांत पावसाचे चित्र पाहायला मिळू शकते. तर दुसरीकडे उत्तर भारतात थंडीसह दाट धुक्याचे संकट वाढले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ‘अकवान’ हे चक्रीवादळ गुरुवारी रात्री अधिक शक्तिशाली झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘अकवान’ हे चक्रीवादळ आज दुपारी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर म्हणजे गंजाम जिल्ह्यातील गोपाळपूरजवळ धडकण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ‘अकवान’ हे चक्रीवादळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातून ताशी 19 किमी वेगाने उत्तर-वायव्यकडे सरकत आहे. गुरुवारी रात्री 11:30 वाजता हे वादळ आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून आग्नेयेकडे 170 किमी आणि विशाखापट्टणमपासून पूर्व-आग्नेयेकडे 200 किमी आणि ओडिशातील गोपाळपूरपासून दक्षिणेकडे 240 किमी अंतरावर होतं. तसेच हे वादळ किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किमी असू शकतो, तर काही ठिकाणी हा वेग ताशी 90 किमीपर्यंत असण्याची शक्यता आहे.
विशाखापट्टणम किनारपट्टीवर 20 ते 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. विशाखापट्टणमवरील चक्रीवादळाचा धोका टळला असला, तरी आज उत्तर आंध्र प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे.