पेट्रोल-डिझेलच्या टँकरला भीषण आग

-ढाबा व चारचाकी, दुचाकी वाहने भस्मसात -नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील घटना

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
वरोडा,
fire breaks out नागपूर-चंद्रपूर महामार्गावर वरोडा शहराजवळील मालू पेट्रोल पंपासमोर गुरुवारी मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरला अचानक भीषण आग लागली. टँकरमधील इंधनाने पेट घेतल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. यात आगीत परिसरातील एक ढाबा आणि चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान झाले.
 
 
 
fire
 
टँकर (एमएच 34 बीझेड 4019) नागपूर येथील बोरखेडी डेपोतून चंद्रपूरच्या दिशेने जात होता. टँकरमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही असल्याचे सांगण्यात येत आहे. टँकरला आग लागल्यानंतर इंधन रस्त्यावर सांडल्याने आगीची तीव्रता आणखी वाढली. या आगीत रस्त्यालगत असलेल्या दत्तू झाडे यांच्या ढाब्याचे मोठे नुकसान झाले असून, तेथील चारचाकी आणि दुचाकी वाहने जळून खाक झाली.
या घटनेचे गांभीर्य अधिक होते. कारण अपघातस्थळाच्या एका बाजूला भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप व गॅस स्टेशन, तर दुसर्‍या बाजूला रेल्वे मार्ग आहे. टँकरमधील पेट्रोल-डिझेलच्या आगीने पेट्रोल पंपापर्यंत पोहोचल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेत टँकर चालक सुखरूप असल्याची माहिती असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी चंद्रपूरकडे जाणारी वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. त्यानंतर जळालेला टँकर रस्त्याच्या बाजूला करण्याची कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, टँकरला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.fire breaks out भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन वाहतूक करणार्‍या टँकरची मध्यरात्रीच्या वेळी होणारी वाहतूक नियमांनुसार आहे का, याची संबंधित विभागाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच आगीत ढाब्याचे आणि वाहनांचे नुकसान झाल्याने भारत पेट्रोलियम कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ढाबामालक दत्तू झाडे यांनी केली आहे.