भारताला धमकी देणारा मंत्री दिल्लीत दाखल!

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
minister-who-threatened-india-arrives-in-delhi ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमधील एका मंत्र्याने भारताला भेट दिली आहे. पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक हे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सिव्हिलायझेशनल डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या परिषदेत १५ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.
 
delhi
 
मुसादिक मलिक यांच्या भारत दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील एखाद्या मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा आहे. यापूर्वी २०२३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी गोव्यात आले होते.
  
विशेष म्हणजे, भारतात दाखल झालेले मुसादिक मलिक यांनी यापूर्वी सिंधू पाणी कराराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. भारताने या कराराबाबत कठोर भूमिका घेतल्यास पाकिस्तानही मागे हटणार नाही, असा इशारा देताना त्यांनी हात कापून टाकण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने सोशल मीडियावर पोस्ट करत मुसादिक मलिक यांच्या दिल्ली दौऱ्याची माहिती दिली आहे. या परिषदेसाठी ते पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
 
दरम्यान, अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भारत-पाकिस्तान संबंधांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. पाकिस्तानकडून भारतात दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असेल, तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. रक्तपात आणि संवाद एकाच वेळी सुरू राहू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
अमेरिकेतील एका कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकाने भारत आणि पाकिस्तानने परस्परांवरील आरोप बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी दोन्ही देशांमध्ये संवादाची शक्यता नाकारली नाही. मात्र, पाकिस्तानने आपल्या देशातील दहशतवादाला पाठिंबा देणे आणि त्याला प्रोत्साहन देणे थांबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. निष्पाप नागरिकांची हत्या होत असताना पाकिस्तानशी चर्चा करणे भारताला मान्य नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानकडून दहशतवाद थांबवला गेल्यास संवादाचे मार्ग पुन्हा खुले होऊ शकतात, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला.