दीड हजार बेवारस वाहनांचा रस्त्यांवरून ‘करेक्ट कार्यक्रम’!

नागपूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; फुटपाथ मोकळे, वाहतुकीला दिलासा

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur-1500-abandoned-vehicles-removedशहरातील रस्त्यांच्या कडेला आणि फुटपाथवर वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या बेवारस, भंगार व नादुरुस्त वाहनांना अखेर हटविण्यात आले आहे. नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल दीड हजार वाहने हटविल्याने अनेक रस्ते आणि फुटपाथ मोकळे झाले आहेत. या कारवाईमुळे वाहतुकीतील अडथळे दूर होण्यासोबतच पादचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
 

traffic police 
शहरातील विविध रस्ते, चौक, प्रमुख मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणांच्या कडेला अनेक वर्षांपासून बेवारस व नादुरुस्त वाहने पडून होती. काही वाहनांची अवस्था भंगारासारखी झाली होती. या वाहनांनी रस्त्यालगतची मोठी जागा व्यापल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. फुटपाथवरून चालण्यासाठी जागा नसल्याने पादचाऱ्यांना थेट रस्त्यावरून चालण्याची वेळ येत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचा धोकाही वाढला होता. या समस्येची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने संपूर्ण शहरात धडक मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान सुमारे १,५०० बेवारस, भंगार व नादुरुस्त वाहने हटविण्यात आली. अनेक वर्षांपासून अडथळा ठरलेल्या या वाहनांना हटविल्यामुळे रस्त्यांच्या कडेला मोकळी जागा उपलब्ध झाली असून, वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी हवालदार पतिराम कौरती, हर्षद वासनिक आणि मुंजाजी हागे या अंमलदारांनी विशेष प्रयत्न केले.
नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या सहकार्यामुळे कारवाई अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले. अनेक वर्षांपासून रस्ते आणि फुटपाथवर अडथळा ठरणारी वाहने हटविल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
बेवारस वाहनांची माहिती द्या!
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सुरळीत आणि अडथळामुक्त करण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. रस्त्यांवर किंवा फुटपाथवर अनेक दिवसांपासून बेवारस, भंगार अथवा नादुरुस्त वाहने उभी असल्यास नागरिकांनी वाहतूक पोलिसांना माहिती द्यावी. यासाठी ९३५६८४७३१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन अशा वाहनांची माहिती द्यावी आणि शहरातील रस्ते व फुटपाथ अडथळामुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.