प्रेमात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या मामीच्या हत्याकांडात आरोपी अटकेत

अपहरण करुन जंगलात नेऊन केला खून

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-aunt-murder-accused-arrestedअल्पवयीन प्रेयसीसोबतच्या प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या मामीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांनी आरोपीला अटक केली. अक्षय शालीमार कराटे (३०) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रियंका ऊर्फ प्रिया सावरकर (३५) असे मृत महिलेचे नाव आहे.
 
murder acused
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. ही मुलगी प्रियंका हिची भाची आहे. अक्षयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. या संबंधांची माहिती प्रियंकाला मिळाल्यानंतर तिने अक्षयला चांगलेच खडसावले होते. तसेच भाचीपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. याचाच अक्षयच्या मनात राग होता. ६ नोव्हेंबरच्या काही दिवस आधी अक्षयने अल्पवयीन प्रेयसीला मारहाण केली होती. ही बाब प्रियंकाला समजताच तिने अक्षयला जाब विचारला. त्याच्या आणि भाचीच्या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या आजीला देण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान, मुलीच्या आजीलाही या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. त्यांनीदेखील अक्षयला मुलीपासून दूर राहण्याची सक्त ताकीद दिली.
प्रियंकामुळेच आजीला या संबंधांची माहिती मिळाल्याचा संशय अक्षयला होता. याच रागातून ६ नोव्हेंबरला त्याने प्रियंकाचे अपहरण केले. तिला वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन काठीने डोके, हात आणि पायांवर बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला तेथेच सोडून तो पसार झाला. कसाबसा घरी पोहोचलेल्या प्रियंकाची चार दिवसांनंतर प्रकृती खालावली. त्यामुळे तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १२ नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी अक्षयविरुद्ध हत्येसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. अक्षय हा नंदनवन झोपडपट्टी परिसरातील रहिवासी असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.