बुलंदशहर,
naseem-durrani-encounter-bulandshahrउत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत अंडरवर्ल्डशी संबंधित कुख्यात गुंड नसीम दुर्रानी याचा एन्काऊंटर केला आहे. 'डी कंपनी' आणि छोटा शकील यांच्याशी कनेक्शन असलेल्या नसीम दुर्रानीवर दिल्लीतील एका खळबळजनक हत्याकांडात सहभाग असल्याचा आरोप होता. संयुक्त मोहिमेदरम्यान झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या नसीमचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चकमकीत गोळ्या लागल्याने झाला मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका हत्या प्रकरणात मोस्ट वॉन्टेड असलेला नसीम दुर्रानी बुलंदशहरमध्ये असल्याची गुप्त माहिती नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई करत त्याला घेरले. या दरम्यान नसीम आणि पोलिसांमध्ये दोन्ही बाजूंनी अनेक फैरी झाडण्यात आल्या.
नसीम दुर्रानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोडा यांसारखे २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. नुकत्याच १६ नोव्हेंबर रोजी त्याने दिल्ली सरकारमधील मंत्री कपिल मिश्रा यांच्या कार्यालयाबाहेर समीर नावाच्या व्यक्तीवर १५ ते २० गोळ्या झाडून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर तो पोलिसांच्या रडारवर होता.