नागपूर,
nomadic-community-campराज्यातील भटक्या समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विशेष राजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. येत्या ७ आणि ८ जानेवारी रोजी भटक्या समाजाच्या वस्त्यांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, या माध्यमातून जन्मदाखले, घरांचे कागदपत्रे आणि इतर आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिली.
या अभियानासाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली असून, लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन आणि विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून अभियान राबविले जाणार आहे. फासेपारधी समाजाच्या विकासासाठीही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या समाजासाठी गावठाणे गठित करणे, तांड्यांना ग्रामपंचायतीचे अधिकार देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा आणि रोजगारनिर्मितीसाठी साधने उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
दत्ता भरणे प्रकरणाच्या चौकशीबाबत बोलताना, या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरात लवकर निकाल लागावा, अशी सर्वांची मागणी असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. सातारा बँक प्रकरणावरून महायुतीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली. हा स्थानिक राजकारणाशी संबंधित विषय असून, एखाद्या जिल्ह्यातील मतभेदांचा महायुतीवर परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दीक्षाभूमीच्या नामांतराबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, नागपूरची दीक्षाभूमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. नागपुरात येणारा प्रत्येक व्यक्ती दीक्षाभूमीला भेट देतो. दीक्षाभूमीच्या नावानेच नागपूरची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. संजय राऊत काय सांगतात, यापेक्षा दीक्षाभूमीचे महत्त्व संपूर्ण जगाला माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
इंदू मिल स्मारक प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चाबाबत बोलताना, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला असून संपूर्ण स्मारक प्रकल्प सरकार पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही काळ बांधकाम साहित्य उपलब्ध न झाल्याने कामाला विलंब झाला. मात्र, उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्या ट्विटवर टीका करताना बावनकुळे यांनी, राहुल गांधी सकाळपासून रात्रीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. कोणताही विषय मिळाला की त्यावरून टीका केली जाते. त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असून ते स्वप्नांचे सौदागर आहेत, अशी टीका केली.
दरम्यान, नागपूर रिंग रोडसंदर्भात शेतकऱ्यांसोबत बैठक झाली असून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. कोकणातील आंब्याच्या जिओ टॅगिंगबाबत चेन्नई न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू असून, राज्य सरकारने यासंदर्भात स्वतंत्र शासन निर्णय काढलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.