अनिल कांबळे
नागपूर,
police-raid देहव्यापाराचे केंद्रस्थान असलेल्या गंगा-जमुना परिसरातील कथित अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासह सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करण्यासाठी लकडगंज पोलिसांनी गुरुवारी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित केल्याच्या आरोपावरून सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय रस्त्यावर अनधिकृतपणे ऑटो उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ऑटोचालकांविरुद्ध दोन गुन्हे नोंदविण्यात आले.

१९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गंगा-जमुना सिमेंट रोड आणि आतील परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. परिसरातील सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखणे, अनैतिक कृत्यांना प्रतिबंध घालणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश होता. यासाठी महिला पोलीस अंमलदार आणि विशेष पथक तैनात करण्यात आले होते. लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस अंमलदार आणि विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. गंगा-जमुना परिसरातील गैरप्रकार, सार्वजनिक ठिकाणी होणारे नियमभंग आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांविरुद्ध अशा मोहिमा यापुढेही सुरू राहतील, असा इशारा लकडगंज पोलिसांनी दिला आहे.
देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन गुन्हे
कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व इशारे करून ग्राहकांना आकर्षित करताना आढळल्याच्या आरोपावरून सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याच्या (पीटा) कलम ७ आणि ८ अंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. अनेकदा महिलांच्या अश्लील हातवारे करण्याच्या कृत्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
रस्त्यावर ऑटो उभे करणाऱ्यांवरही कारवाई
गंगा-जमुना सिमेंट रोड आणि परिसरातील सार्वजनिक रस्त्यांवर अनधिकृतपणे ऑटो उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली. अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले.