‘युगप्रवर्तक’ महानाट्याने रसिक भारावले !

राष्ट्रभक्ती, त्याग, संघटन आणि सेवाभावाचा इतिहास रंगमंचावर

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
वाशीम,
the-grand-play-yugpravartak राष्ट्रभक्ती, त्याग, समर्पण आणि संघटनशक्तीचा प्रेरणादायी इतिहास उलगडणार्‍या ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या भव्य महानाट्याचा ६७ वा प्रयोग वाशीम नगरीत बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या आयोजनातून आणि नागपूर येथील ‘नादब्रह्म’ संस्थेच्या निर्मितीतून साकारलेल्या या महानाट्याला संत-महंत, मान्यवर आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सुमारे ४० कलाकारांच्या कसदार अभिनयातून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जीवनप्रवास, त्यांचे राष्ट्रकार्य आणि संघटनात्मक योगदान प्रभावीपणे सादर करण्यात आले. या नाट्यप्रयोगाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. अकोला रोडवरील वाटाणे लॉन्स येथे सायंकाळी ६.३० वाजता या महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. संघस्थापनेमागील विचार, त्यासाठी केलेले प्रयत्न, राष्ट्राप्रती असलेली निष्ठा आणि समाज संघटित करण्यासाठी केलेले कार्य या विविध पैलूंचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले.
 
 
yugpravartak
 
यावेळी व्यासपीठावर पोहरादेवी येथील महंत बाबूसिंग महाराज, बालयोगी गोपाल बाबा, नामदेव महाराज काकडे, विजय महाराज शास्त्री (गवळी), पवन महाराज, जिल्हा संघचालक शंकरराव ढोबळे, दिनकर वाटाणे, नगराध्यक्ष अनिल केंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित या महानाट्यात त्यांच्या बालपणापासून ते राष्ट्रकार्याच्या व्यापक प्रवासापर्यंतचे विविध प्रसंग प्रभावीपणे उलगडण्यात आले.
 
 
महानाट्यात डॉ. हेडगेवार यांची प्रमुख भूमिका सतीश खेकाळे यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली. त्यांच्या अभिनयातील सहजता, दमदार संवाद फेक आणि व्यक्तिमत्त्वाचे सशक्त सादरीकरण यामुळे डॉ. हेडगेवार यांचा जीवनप्रवास रंगमंचावर जिवंत झाल्याचा अनुभव प्रेक्षकांना आला. तर गोळवलकर गुरुजी यांची भूमिका अमोल तेलपांडे यांनी समर्थपणे साकारत आपल्या अभिनयाची छाप उमटवली. या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देत नाट्यप्रसंग अधिक जिवंत आणि परिणामकारक केले. या महानाट्याचे लेखन डॉ. अजय प्रधान यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी पद्माकर धानोरकर यांनी सांभाळली आहे. भव्य नेपथ्यरचना, प्रभावी प्रकाशयोजना, प्रसंगानुरूप संगीत, सशक्त संवाद आणि कलाकारांचा कसदार अभिनय यांचा सुरेख संगम या महानाट्यात पाहायला मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवि भुसारी हे या उपक्रमाचे संरक्षक आहेत.
 
 
इतिहास, संस्कृती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक संघटन यांची सांगड घालत सादर झालेल्या या प्रयोगाने उपस्थितांच्या मनावर विशेष ठसा उमटवला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या विशेष प्रयोगाला वाशीमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महानाट्याचे निर्माता पद्मााकर धानोरकर, लेखक डॉ. अजय प्रधान तर दिग्दर्शन सुबोध सुर्जीकर यांनी केले असून, शैलेश दाणी यांनी संगीत दिले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वीतेरित्या पार पडला.