वर्धा,
health-minister-abitkar प्रत्येक रुग्णाला वेळेत, दर्जेदार आणि विश्वासार्ह उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध असतानाही रुग्ण खासगी रुग्णालयांकडे का वळतात, याची कारणे शोधून कामकाजात सुधारणा करावी. अनावश्यक रेफरल करणे टाळा, निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात १९ रोजी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती तसेच आरोग्य विभागाच्या विविध समित्यांच्या पदाधिकार्यांसोबत आयोजित आरोग्य संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाणे, आमदार सुमित वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले आदी उपस्थित होते.
आबिटकर पुढे म्हणाले, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांचे जॉब चार्ट तयार करून त्यांच्या कामाचे नियमित मूल्यमापन करावे. कामात हलगर्जीपणा करणार्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कारवाई करावी. नियुक्ती देऊनही रुजू न होणार्या डॉक्टरांबाबत कठोर भूमिका घ्यावी.
’तिशीचा पल्ला, तपासणीचा सल्ला’ हे महत्त्वाकांक्षी अभियान प्रभावीपणे राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, गावपातळी, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय स्तरावरील समित्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. गावपातळीवरून प्राप्त होणार्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा ’वर्धा पॅटर्न’ राज्यात राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील, असे ते म्हणाले.
वडनेर रुग्णालय जागेचा प्रश्न सोडवा : आ. कुणावार
मॉड्युलर शवागार, डॉक्टरांची रिक्त पदे, औषधसाठा, रेफरल ऑडिट, महिला स्त्री रोगतज्ज्ञांची नियुक्ती तसेच वडनेर येथील रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागेचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.
रुग्णालयांतील रिक्तपदे भरणे आवश्यक : आ. बकाने
तालुक्यातील आरोग्य संस्थांमध्ये रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. पुलगाव व अल्लीपूर येथील रुग्णालयांचे प्रश्न सोडविण्यासह तालुक्यात आवश्यक असलेल्या नवीन आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्याची बाब त्यांनी मांडली.
आरोग्य व्यवस्था सुधारणेचा मास्टर प्लॅन : आ.वानखेडे
सुरक्षा रक्षक, परिचर आणि आरोग्य सेवकांची कमतरता दूर करावी, जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाचा सर्वंकष मास्टर प्लॅन तयार करावा तसेच रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करण्याची मागणी केली.