योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींचे निधन!

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
पौरी गढवाल,
yogi-adityanaths-mother-passes-away उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवारी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. पौरी गढवालचे पोलीस अधीक्षक सर्वेश पनवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
yogi-adityanaths-mother-passes-away
 
सावित्री देवी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून, शनिवारी हरिद्वार येथे अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून शोकाकुल कुटुंबीयांशी संपर्क ठेवण्यात येत असल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली.
 
या दुःखद घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सावित्री देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हटले. आईचे प्रेम, आशीर्वाद आणि माया ही आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच दिवंगत आत्म्यास सद्गती मिळावी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना केली.
 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आईला गमावण्याचे दुःख शब्दांत मांडता येत नाही. आयुष्यात आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले. या कठीण प्रसंगी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत त्यांनी दिवंगत सावित्री देवी यांच्या आत्म्याला शांती लाभावी, अशी प्रार्थना केली.