झाडीपट्टी रंगभूमीला ‘डान्स हंगामा’चा विळखा!

शासनाचे प्रमाणपत्र अनिवार्य, पण नियमांची अंमलबजावणी कागदावरच?

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
संदीप नंदनवार
नागपूर,
zhadipatti-theatre-dance-controversyपूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांची समृद्ध ओळख असलेल्या 'झाडीपट्टी'च्या रंगभूमीला आणि शतकोत्तरी सांस्कृतिक परंपरेला गेल्या काही वर्षांत 'डान्स हंगामा' व अश्लील डीजे लावणीच्या गैरप्रकारांचे मोठे ग्रहण लागले आहे. दिवाळीच्या भाऊबीजेपासून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत भरणाऱ्या पारंपरिक मंडई उत्सवांत पूर्वी नाटक, दंडार, तमाशा आणि लोककलेची मेजवानी असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत या कार्यक्रमांची जागा कथित अश्लील डान्स हंगामा आणि डीजे लावणीने घेतल्याने झाडीपट्टीच्या सांस्कृतिक अस्मितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

marathi theater 
या प्रकाराची गंभीरता शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ रोजी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील कार्यक्रमातून समोर आली. दोन दिवसांनंतर कार्यक्रमाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यानंतर आयोजक व कलाकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी तत्कालीन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खडीगंमत व तत्सम कार्यक्रमांतील महिलांच्या सन्मानाचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करत विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निर्देश दिले. अल्पवयीन मुलींच्या सहभागावर बंदी, कार्यक्रमांचे चित्रीकरण आणि परराज्यातून कलाकार आणण्याबाबत काटेकोर तपासणी करण्यावरही भर देण्यात आला.
पुढे १४ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयानुसार सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेला आळा घालण्याच्या दृष्टीने हा सकारात्मक निर्णय ठरला. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
मात्र, निर्बंधांनंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला दिसत नाही. नोव्हेंबर २०२६ मध्ये मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथे साधूच्या वेशातील व्यक्तीभोवती आक्षेपार्ह नृत्य झाल्याची चित्रफीत प्रसारित झाली. या प्रकाराचा विविध संघटनांनी निषेध केला. याच तालुक्यातील रोहणा गावात दुष्काळी परिस्थिती असतानाही लोकप्रतिनिधींकडून कलावंतांवर पैशांची उधळण केल्याचे व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना या प्रकारावरूनही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, लावणी, नृत्य किंवा लोककला चुकीची नसून तिच्या सादरीकरणातील अश्लीलता आणि अनियंत्रित बाजारीकरण हा खरा प्रश्न आहे. झाडीपट्टीने ‘तंट्या भिल्ल’, ‘भूक’, ‘आत्महत्या’ यांसारखी आशयघन नाटके दिली. ही परंपरा टिकविण्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि रोजगार मिळणेही तितकेच आवश्यक आहे.
परवानगी, तपासणी आणि कारवाईत सातत्य नसेल तर आदेशांचा उपयोग काय?
ग्रामीण जनतेला सहकुटुंब मंडईत जाणे कठीण झाले असून, नवीन पिढीसमोर 'ना धड दंडार, ना धड नाटक, ना धड लोककला' अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ कागदावर नियम न ठेवता, प्रशासनाने यावर कठोर अंमलबजावणी करून झाडीपट्टीचा मूळ सांस्कृतिक वारसा टिकवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शासनाचे निर्बंध स्वागतार्ह असले, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. परवानगी, तपासणी आणि दोषींवरील कारवाईत सातत्य नसेल, तर अशा आदेशांना अर्थ उरणार नाही. यामुळे मंडई उत्सवाला पुन्हा कौटुंबिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक स्वरूप देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
नाटकांना प्रोत्साहन द्या; लोककला वाचवा!
मंडईतील डान्स हंगामाच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लीलतेला आळा घालण्यासाठी शासन निर्णयाची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याचवेळी झाडीपट्टीची समृद्ध नाट्यपरंपरा जपण्यासाठी पारंपरिक नाटकांना विनाअडथळा परवानगी देऊन स्थानिक कलाकारांना रोजगार व प्रोत्साहन द्यावे.
- पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,
ज्येष्ठ नाट्यकलावंत, गुरनोली, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली.