महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
पुणे
cold wave
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अकवान’ चक्रीवादळाने शुक्रवारी सकाळी दक्षिण ओदिशातील गोपाळपूर किनारपट्टीवर धडक दिली. यावेळी ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मात्र, किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच वादळाची तीव्रता कमी होऊ लागली आणि शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. या हवामान बदलाचा परिणाम उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओदिशामध्ये दिसून आला असून, या भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.



शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वादळाची जमिनीवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, समुद्रातील थंड पाण्याचे तापमान आणि जमिनीवरून वाहणारे थंड वारे यांमुळे त्याला अपेक्षित ताकद मिळू शकली नाही. गोपाळपूर किनारपट्टीवर धडकल्यानंतर वादळाचा वेग आणि प्रभाव आणखी कमी झाला. तरीही ओदिशाच्या किनारी भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा तडाखा बसला. राज्यातील अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे आणि विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविल्याने मोठी जीवितहानी टाळण्यात यश आले.

वादळाची तीव्रता आता ओसरली असली, तरी त्याच्या परिणामांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. छत्तीसगड, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, नागालँड आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये आगामी दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वादळाचा थेट धोका कमी झाला असला, तरी त्याच्या प्रभावक्षेत्रातील राज्यांना पावसाचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांतील गारठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वादळाच्या प्रभावामुळे राज्यातील उर्वरित भागांतही थंडीचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी आठवडाभरात महाराष्ट्रासह मध्य, उत्तर आणि वायव्य भारतातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी, थंडीचा कडाका वाढण्याबरोबरच धुक्याचे प्रमाणही वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.